ट्रान्समिशन प्रकल्पग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक पीक भरपाई; डिमांड ड्राफ्ट वाटप पारदर्शकतेने पूर्ण..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर
खावडा ट्रान्समिशन प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना पीक भरपाईचे वितरण खावडा ट्रान्समिशन प्रकल्पाकडून सुरळीतपणे पार पडले.





गुजरातमधून महाराष्ट्रासाठी उभारण्यात येणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत, पालघर जिल्ह्यातील विविध गावांमधील शेतीजमिनींवर ट्रान्समिशन टॉवर्स उभारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, खावडा ट्रान्समिशन प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकतीच पीक भरपाई दिली गेली. या भरपाईचे वितरण डिमांड ड्राफ्ट (डीडी) स्वरूपात करण्यात आले असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर पार पडल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वितरणावेळी विविध गावांतील शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग आणि दिलेला सकारात्मक प्रतिसाद उल्लेखनीय ठरला. ऊर्जामंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाच्या सहकार्याने ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध रीतीने राबवण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीवर ट्रान्समिशन टॉवर्स उभारण्यात आले किंवा वीजवाहिन्यांमुळे शेती प्रभावित झाली, त्यांना पीक भरपाई देताना शेतीचा प्रकार, हंगामी उत्पादन, शेतीपद्धती आणि जमिनीचे शेतीमूल्य आदी घटकांचा विचार करण्यात आला. या पूर्वीच पालघर जिल्ह्यातील भरपाईचे दर जाहीर करण्यात आले होते आणि त्याला शेतकऱ्यांनी समाधानकारक म्हणत प्रतिसाद दिला होता.
डिमांड ड्राफ्ट मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाविषयी विश्वास व्यक्त केला आणि दिलेल्या भरपाईवर समाधान दर्शवले. काहींनी ही प्रक्रिया इतर प्रकल्पांसाठीही मार्गदर्शक ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हास्तरीय अधिकारी आणि कृषी विभागाचे कर्मचारी यांनी या प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा तात्काळ, न्याय्य आणि पारदर्शक भरपाई योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि भविष्यातील पायाभूत प्रकल्पांमध्ये त्यांचे सहकार्य अधिक सुलभ होते.