ठाण्यात टोविंग उपक्रमाबाबत पोलीस बाईज संघटनेतर्फे पोलीस आयुक्ताना विशेष निवेदन..

सह संपादक -रणजित मस्के
ठाणे

प्रति,
सन्मा.श्री.आशुतोष डुंबरे साहेब
विद्यमान पोलीस आयुक्त सो,
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय
जि.ठाणे , महाराष्ट्र राज्य,
यांसी ,
विषय : ठाणे शहर महानगरपालिका व वाहतूक नियंत्रण विभागमार्फत ठाणे शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोविंग उपक्रमाविषयी सुरू असलेल्या वा करण्यात आलेल्या जनआंदोलन , मोर्चे , पोलीस प्रशासन यांच्या कार्यक्षमतेवर करण्यात आलेले विविध आरोप व इतर बाबीं संदर्भात निवेदन….
सन्मा. महोदय ,
उपरोक्त विषयाअन्वये सदर पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत अलीकडे सुरू करण्यात आलेल्या टोविंग सेवेसंदर्भातील जनआंदोलन आणि सामाजिक प्रतिक्रिया यावर आमची भूमिका नम्रपणे सादर करत आहोत. अलीकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून, विशेषतः श्री.अजय जेया व श्री.ऋषिकेश तायडे ( शेतकरी कामगार पक्ष, ठाणे शहर अध्यक्ष ) यांच्याकडून, ठाणे शहर वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोविंग सेवेसंदर्भात तीव्र स्वरूपात निषेध मोर्चे आणि आंदोलने करण्यात आलेली आहेत. यामध्ये पोलीस प्रशासनावर काही गंभीर स्वरूपाचे आरोपदेखील करण्यात आले आहेत.
तथापि, आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, सदर टोविंग सेवा ही ठाणे शहर महानगरपालिका व वाहतूक नियंत्रण विभाग यांच्या एकत्रित नियोजनाचा भाग असून कायदा सुव्यवस्था व वाहतुकीबद्दलची शिस्त यांचा अंमल होण्यासाठी राबवली जात आहे. सदरील टोविंग सेवा ही महानगरपालिका यांच्या अधिकार कक्षेचा भाग असून वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग केवळ कायदा व वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. टोविंग व्हॅन बाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास त्या योग्य अधिकृत मार्गाने मांडल्या गेल्यास अधिक सकारात्मक संवाद साधता येईल असे आमचे मत आहे. महानगरपालिका व वाहतूक पोलीस नियंत्रण विभाग यांनी तयार केलेली नवीन Standard Operating Procedure ( SOP ) किंवा नियमावली सध्या प्रसारित झालेली नसल्यामुळे, तिच्या आधारे निष्कर्ष काढणे वा कोणताही निषेध करण्याऐवजी ती अधिकृतरीत्या प्रसिद्ध झाल्यानंतरच नागरिकांनी किंवा सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी आपली मते मांडावीत, अशी आमची स्पष्ट भूमिका वा मत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणे आणि जनहिताच्या मुद्यांवर चर्चा करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहेच , याचा आम्हाला पूर्ण सन्मान आहे. मात्र यावेळी काही ठिकाणी झालेली वादावादी, तणावाची स्थिती आणि त्यातून निर्माण होणारी अशांतता ही आपल्या शहराच्या कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब ठरू शकते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये संयम बाळगणे व संवादाद्वारे मार्ग काढणे हे अधिक परिणामकारक ठरेल, असा आमचा विश्वास आहे.
तसेच टोविंग प्रकल्प पुन्हा सुरू केल्याच्या या सर्व प्रकरणी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे विद्यमान पोलीस उपआयुक्त सन्मा.श्री.पंकज शिरसाट साहेब ( DCP ) यांची बदली थेट गडचिरोली जिल्ह्यात करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. सदरील बदलीची मागणी कोणत्या विशिष्ट कारणास्तव करण्यात येत आहे, याची सुस्पष्टता सबंधित सामाजिक कार्यकर्ते यांनी देणे आवश्यक आहे. अशा मागण्यांचा आढावा संबंधित प्रशासनाने घेऊन योग्य त्या स्तरावर निर्णय घ्यावा व यासंदर्भात चौकशी करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही नेहमीच कायदा व सुव्यवस्था , प्रशासन, आणि जनतेमधील समतोल राखण्यासाठी कटिबद्ध आहे. या विषयावरही जनतेच्या भावना जपून, कायद्याचा आदर राखून, योग्य संवादातून समाधान मिळावे, हाच आमचा उद्देश आहे.
आपण या सर्व बाबींचा विचार करून योग्य कार्यवाही कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद…!!
आपला विश्वासू,
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
ठाणे जिल्हा अध्यक्ष
उमेश गोवर्धन भारती