सांगली जिल्हा पोलीस दलातील गुन्हे शोधक पोलीस श्वान कुपर याचा हृदयविकाराने मृत्यु…

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

सांगली

सांगली जिल्हा पोलीस दलात डॉबरमन जातीचे कुपर नावाचे गुन्हे शोधक पोलीस श्वान (जन्मतारीख ०६.०८.२०१९) सन २०१९ पासुन कार्यरत होते. सदर श्वानाने दिनांक १०,०१,२०२० ते दिनांक ३०.१०.२०२० दरम्यान श्वान प्रशिक्षण केंद्र, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे १० महिन्याचे प्रशिक्षण पुर्ण केले होते. सदर श्वानासाठी पोह / सुहास भोरे व मपोकों / शबाना आत्तार हे हस्तक (डॉग हॅन्डलर) म्हणुन कार्यरत होते. कुपर श्वानाने प्रशिक्षण पूर्ण केलेपासुन दिनांक ०७.०८.२०२५ अखेर जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध श्वान म्हणुन सेवा बजावली आहे.

कुपर श्वानाने त्याचे सेवा काळात जिल्हयातील पोलीस ठाण्याकडुन आलेले ३६४ कॉलचे घटनास्थळी भेट देवुन त्यापैकी १३ गुन्हे उघडकीस आणणे कामी मोलाचे सहकार्य झाले आहे.

सन २०२१ मध्ये जत व सन २०२२ मध्ये हरीपुर गावातील खुनाच्या गुन्हयांमध्ये कुपर श्वानाने आरोपीचा माग दाखुवन तपास कामी महत्वाचे सहकार्य केले होते. आटपाडी येथील घरफोडीच्या गुन्हयामध्ये कुपर श्वानाने आरोपीचे दाखविलेल्या मागामुळे संशयित आरोपीस अटक करुन त्याचेकडुन ३,५०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करणेत यश मिळाले होते.

या वर्षी कुपर श्वानाने एकुण ३८ गुन्हयांचे तपासामध्ये आरोपींचे माग दाखवुन तपास कामी सहकार्य केले होते. कुपर श्वानाच्या कर्तृत्वाची दखल घेवुन सांगली जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री श्री. सुरेश (भाऊ) खाडे यांचे हस्ते त्याचा सत्कार करणेत आला होता. तसेच मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांचे हस्ते ०२ वेळा चांगल्या कामगिरीसाठी त्याचा सत्कार करणेत आला होता.

श्वान कुपर यांने त्याचे ४ वर्षे ०८ महिन्याचे सेवा कालावधीत सांगली जिल्हा पोलीस दलाकरीता वरीलप्रमाणे बहुमुल्य कार्य बजावत असताना दिनांक ०७.०७.२०२५ रोजी त्याने अचानक जेवण करणे बंद केल्याने त्यास उपचारा कामी पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना, मिरज येथे नेले असता त्याचेवर औषधोपचार सुरु असताना तो मयत झाला आहे. डॉक्टरांनी कुपर श्वानाचे पोर्स्ट मार्टम करुन त्यास मरण हे हृदयविकाराने आल्याचे सांगितले आहे.

श्वान कुपर याचा पोलीस मुख्यालय, सांगली येथे शासकीय इतमामात शोक सलामी देवुन अंत्यसंस्कार करण्यात आला असुन श्वान कुपर यास अंतिम निरोप देताना श्वान पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अश्रु अनावर झाले होते. कुपर यास अंतिम निरोप देताना मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांचेसह पोलीस उपअधीक्षक (गृह) तानाजी सावंत, सतिश शिंदे पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ. शाखा, सांगली, भैरु तळेकर पो.नि. जि.वि. शाखा, सांगली, बाळासाहेब अलदर राखीव पोलीस निरीक्षक, पो.मु. सांगली, श्वान पथकाचे प्रभारी, पोलीस उपनिरीक्षक-मोरे, पोलीस मुख्यालय, सांगली व श्वान पथकाकडील अधिकारी तसेच अंमलदार यांनी उपस्थिीत राहुन आदरांजली वाहीली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट