बदलापूर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सांगली प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार …!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :– बदलापूर येथे चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षणाधिकारी यांची तातडीने बैठक झाली. जिल्ह्यात बदलापूरची पुनरावृत्ती घडू नये, म्हणून ‘ॲक्शन प्लॅन’ राबवण्याचे ठरले. शाळा, कॉलेजच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची बैठक घेतली जाणार आहे. शाळांमधील स्टाफची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे.बदलापूर येथील घटनेनंतर पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आपली पाल्य शाळेत सुरक्षित आहे ना? याची काळजी सतावत आहे. संपूर्ण राज्यातील पोलिस दल, स्थानिक प्रशासन ‘ॲलर्ट’ झाले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी राज्य पातळीवर पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहे. बदलापूरच्या पार्श्वभूमीवर सांगलीतही बुधवारी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे,मनपा उपायुक्त शिल्पा दरेकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप यादव यांची संयुक्त बैठक झाली.

बदलापूरची पुनरावृत्ती टाळली जावी, यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे ठरले. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, उपअधीक्षक यांना प्रत्येक शाळा, कॉलेजच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्यांची बैठक घेण्यास सांगितले आहे. मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याकडून शाळा, कॉलेजच्या परिसरातील अडचणी विचारून घेतल्या जातील. टवाळखोरांचा किंवा इतर कोणाचा त्रास होत असेल, तर तत्काळ तक्रार करण्याबाबत सक्त सूचना दिल्या जातील. शाळास्तरावरील बैठका तातडीने घेतल्या जाणार आहेत. शाळातील विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने चर्चा करून अडचणी, समस्यांवर तत्काळ तोडगा काढला जाणार आहे.यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सर्वसाधारण तहसिलदार लीना खरात, खाजगी शाळा संघटनेचे सचिव राजेंद्र नागरगोजे आदी उपस्थित होते.

शालेय समित्या कार्यान्वित कराशालेय समित्या त्वरीत कार्यान्वित करा. जर नसतील तर तत्काळ स्थापना करा. प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही बसवा. शाळेत तक्रारपेटी बसवा. त्या तक्रारींचा आढावा प्रत्येक आठवड्यात घ्या. तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास त्वरीत कारवाई करा. मुला-मुलींची स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था विरुद्ध बाजूस करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

शिक्षक-शिक्षकेतरांचे व्हेरीफिकेशनप्रत्येक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हंगामी कर्मचारी आदींचे पोलिस ठाण्यांकडून चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. कोणावर गुन्हा दाखल नाही ना? कोणाच्या संशयास्पद हालचाली नाहीत ना? याचीही तपासणी केली जाणार आहे.

निर्भया, दामिनींची गस्त वाढवणारशाळा-कॉलेजच्या परिसरात निर्भया आणि दामिनी पथकांची गस्त असते. परंतु, आता ही गस्त आणखी कडक होणार आहे. पथकांकडून शाळा, कॉलेजमधील मुला-मुलींशी संवाद साधला जाईल. त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल.

केवळ ६२७ शाळांमध्ये सीसीटीव्हीजिल्ह्यात २७९२ शाळा असून त्यापैकी ६२७ शाळांमध्ये सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरीत शाळांनी सीसीटिव्ही बसवून घ्यावेत. शुन्य महिला शिक्षक असणाऱ्या शाळांचा आढावा घ्यावा. सखी सावित्री समितीची बैठक घेण्यात यावी. तसेच अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ‘पोक्सो’ गुन्ह्याच्या अनुषंगाने शिबीराचे आयोजन करावे अशा सूचना दिल्या.

१०९८ किंवा ११२ वर कॉल कराएखाद्या शाळेत अत्याचारासारखा गुन्हा घडल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा प्राचार्यांनी त्वरित गुन्हा दाखल करावा. अत्याचारासारख्या घटना घडल्यास १०९८ या चाईल्ड लाईन हेल्पलाईन क्रमांकावर अथवा पोलिसांच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी.

बदलापूरच्या घटनेनंतर पोलिस दल सतर्क झाले आहे. जिल्हा प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीनंतर पोलिस ठाणे अधिकारी, उपअधीक्षक यांना सूचना दिल्या आहेत. मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेतल्या जातील. मुले-मुली पालकांकडे प्रथम तक्रार करतात. त्यामुळे पालकांनाही सहभागी करून घेतले जाईल, तसेच आवश्यक त्या सूचना शाळा प्रशासनाला दिल्या जातील. – संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट