रानभाज्या व पारंपारिक खाद्य महोत्सवातून आदिवासी बांधवांना रोजगाराची सुवर्णसंधी

0
Spread the love

उपसंपादक -मंगेश उईके

पालघर

पालघर, दि. 26:-आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार, राज्यातील आदिवासी भागांमध्ये रानभाजी व पारंपारिक खाद्य महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आदिवासी भागांतील रानभाज्या, रानफळे, वनौषधी व अन्नधान्य या उत्पादनांना ‘शबरी नॅचरल’ या प्रीमियम ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे होय.
या अनुषंगाने, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या कार्यक्षेत्रातील वाडा, मोखाडा, विक्रमगड व जव्हार या तालुक्यांमधून स्थानिक महिलांच्या सहभागातून “रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव” दि. 25 जुलै 2025 रोजी, मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील प्रधानमंत्री जनमन योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहात, अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार आणि परिवर्तन महिला संस्था, मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने, नुक्लिअस बजेट योजना 2025–26 (केंद्रवर्ती अर्थ संकल्प योजना) अंतर्गत करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. हरिश्चंद्र भोये आणि प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, जव्हार डॉ. अपूर्वा बासुर उपस्थित होते.

या प्रसंगी आ.श्री. भोये यांनी उपस्थित महिलांना आणि बांधवांना मार्गदर्शन करताना रानभाज्या व पारंपरिक खाद्यपदार्थांचे पोषणमूल्य व आरोग्यदृष्ट्या फायदे विषद केले. त्यांनी सांगितले की, जुने पिढीचे आरोग्य हे त्यांच्या शुद्ध आहारामुळे सक्षम होते. अशा अन्नपदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून आपले आरोग्य सुदृढ करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी महिलांनी सादर केलेल्या खाद्यपदार्थांचे व रानभाज्यांचे कौतुक केले. त्यांनी मार्गदर्शन करताना,
एक अभिनव कल्पना मांडली, की “कोण कोण रानभाज्या खात आहे आणि कोणी पूर्णपणे सेवन केले आहे” याबाबत स्पर्धा आयोजित करावी. या स्पर्धेत ज्या व्यक्तींनी पूर्ण रानभाज्या सेवन केल्या आहेत, त्यांना बक्षिसे देण्यात यावीत, जेणेकरून समाजात रानभाज्यांचे महत्त्व वाढेल आणि मोखाडा तालुका ‘कुपोषणमुक्त’ होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जाईल. या स्पर्धेला उपस्थित महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर रानभाज्या व पारंपरिक खाद्य मोहोत्सवच्या निमित्ताने, घेण्यात आलेल्या, स्पर्धे मध्ये उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या महिलांना प्रथम, दिवतीय, तृतीय, उत्तेजनार्थ, पारितोषिक, आ.हरिश्चंद्र भोये व, प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे हास्ते देण्यात आले.या रान भाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवासाठी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, कार्यालय अधीक्षक शयोगेश भोये, आदिवासी विकास निरीक्षक महेश वराडे, संतोष तीर्थाप, परिवर्तन महिला संस्थेच्या प्रमुख परचुरे मॅडम, ग्रामपंचायत पळसपाडा सरपंच, उपसरपंच, माजी, पंचायत समिती सभापती श्री.डामसे, व ग्रामविकास अधिकारी मंगेश पाटील, तसेच, स्थानिक बांधव, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट