पुण्यात मासिक 15 ते 20 % व्याजदराने कर्ज देणाऱ्या सावकाराला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या..

पुणे : समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील महिना १५ ते २० % व्याजावर कर्ज देऊन त्यावर दररोज १० हजार रुपये दंडाच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणी विरोधी पथकाने अशा सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आरोपी विनोद राम शिंदे वय ५६ वर्षे रा. रास्ता पेठ असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी पियुष शहा यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पियुष शहा यांनी सावकार शिंदे याच्याकडून जून २०२० मध्ये २ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यावर शिंदे याने प्रति महा १५ ते २0 % दराने व्याज लावले होते. शहा यांनी जून २०२० ते सप्टेबर २०२१ पर्यंत रोख व गुगलपेद्वारे व्याजापोटी २ लाख ८० हजार रुपये दिले. त्यानंतर शहा हे हप्ता देऊ शकले नाही. त्यामुळे शिंदे याने शहा यांना शिवीगाळ व दमदाटी करुन सप्टेबर २०२१ पासून आतापर्यंत प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये व २ हजार रुपये दंड असा सर्व मिळून १२ लाख रुपयांची मागणी केली.
शहा यांनी खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रार अर्जाची तपासणी केल्यावर शिंदे याने खंडणी मागितल्याचे समोर आले. पोलिसांनी शिंदे याला अटक केली.
अधिक तपासासाठी त्याला समर्थ पोलिसांच्या हवाली केले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे , उपायुक्त श्री. श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. श्रीकांत चव्हाण पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे,शैलेश सुर्वे, विनोद साळुके, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com