पौंड येथील देवीच्या मूर्तीची विटंबना प्रकरणी मोर्चातून उमटली संतापाची लाट..

प्रतिनिधी- मारुती गोरे
सकल हिंदू समाजाचा तीव्र रोष, सोमवारी तालुका बंदची हाक, निघणार निषेध मोर्चा


पौड : हिंदू मंदिरातील देवीच्या मुर्तीची विटंबना झालेल्या घटनेचा मुळशी तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हिंदू समाजात यामुळे मोठा रोष पसरला असून शनिवारी पौडमध्ये मोर्चा काढण्यात आला व कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सोमवारी मुळशी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी पौड, ता.मुळशी येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना मुस्लिम युवकाकडून करण्यात आली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्याने तीव्र संतापाची लाट पसरली. त्यात रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असताना कोणीतरी संतप्त युवकांनी पौडमधील मशिदीच्या काचा फोडल्या. मूर्ती विटंबना घटनेतील आरोपी युवक चांद शेख व घटनेनंतर धमकी देणारे आरोपीचे वडील नौशाद शाबाद शेख (वय ४४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
त्यानंतर शनिवारी दुपारी पौड येथील दिगंबरनाथ मंदिरापासून नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. संपूर्ण पौडमध्ये निघालेल्या या मोर्चात मूर्ती विटंबना घटनेचा निषेध व संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोर्चेकऱ्यांनी भाषण करत या घृणास्पद कृत्यावर तोफ डागत, प्रशासनाने यावर त्वरित ठोस व कडक पावले उचलण्याची मागणी केली. तर भाडेकरू म्हणून राहत असलेल्या समाज कंटकांना शोधून त्यांना तडीपार करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच सोमवारी दि.५ मे रोजी संपूर्ण मुळशी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच संपुर्ण तालुक्याचा निषेध मोर्चाही काढणार असल्याचे जाहिर केले आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून घटनेची सखोल चौकशी करून कार्यवाही व कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपअधीक्षक सुनील कुमार पुजारी व पौड पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी देखील सखोल तपास करणार असल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी कांबळे करत असून पोलीस उपनिरीक्षक घुले यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस प्रशासनाने सतर्क राहून या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे. अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. तर जागरूक नागरिकांनीही घुसखोर व समाजकंटक असलेल्या नागरिकांना थारा न देता, त्यांच्या उच्चाटनासाठी पोलिसांना सहकार्य करावे.
दरम्यान, पौड येथील नागेश्वर मंदिर व मशिदीला बंदोबस्त ठेवण्यात आला असून पौड मध्ये पोलिसांचा जागता पहारा आहे. घोटवडे फाट्यावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणीही कृत्य करू नये, केल्यास त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व कोणीही अफवा पसरवू नये असे पौड पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले