पोस्को महाराष्ट्र स्टील तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नकाशे व इतर साहित्य वाटप – गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प..

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव परायगड
माणगांव :-शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा मूलभूत आधार असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत परिसरातील ५५ शाळांमध्ये नकाशे वाटप उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. या उपक्रमांतर्गत जवळपासच्या ५ केंद्रशाळा आणि इतर ४४ शाळांचा समावेश आहे. तसेच ६ माध्यमिक शाळांमध्येही नकाशे वितरित करण्यात आले आहेत.
शालेय शिक्षणात नकाशांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, भौगोलिक संकल्पना समजावून घेण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. ही गरज लक्षात घेऊन पोस्को महाराष्ट्र स्टीलने प्रत्येक शाळेसाठी वर्गानुसार ४-४ नकाशे वितरित केले, ज्यामध्ये जग, भारत, राज्य, जिल्हा यांचे भौगोलिक नकाशे, पृथ्वीगोल, भिंग, घड्याळ, फुटबॉल यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना नकाशांचा योग्य प्रकारे उपयोग करता यावा आणि त्याचा अभ्यासात अधिक प्रभावी वापर करता यावा, यासाठी कंपनीच्या विविध विभागातील ३४ अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले. नकाशा वाचनाचे महत्त्व समजावून देत, नकाशांमधून कोणती माहिती मिळते, त्यांचा अभ्यास कसा करावा आणि त्यांचा प्रभावी उपयोग कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आली.
या उपक्रमावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एका विद्यार्थ्याने सांगितले, “आम्हाला भूगोल शिकताना नकाशांचा वापर करणे सोपे आणि अधिक रुचकर वाटते. पूर्वी आम्हाला केवळ पुस्तकातील नकाशांवर अवलंबून राहावे लागत असे, पण आता मोठ्या प्रमाणात नकाशे उपलब्ध झाल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती अधिक स्पष्टपणे समजू शकतो.”
शाळेतील शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नकाशांचा वापर करून शिकवता आल्यास त्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होते. पोस्को महाराष्ट्र स्टीलने दिलेल्या या नकाशांमुळे आमच्या अध्यापन प्रक्रियेत मोठी मदत झाली आहे. हे नकाशे केवळ भूगोल शिकण्यासाठीच नाही तर इतिहास, नागरीकशास्त्र आणि पर्यावरण विषयांसाठीही उपयुक्त ठरणार आहेत.”
पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर समाजाच्या विकासातही मोलाची भूमिका बजावत आहे. शिक्षणाच्या विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. या उपक्रमामुळे माणगांव परिसरातील विद्यार्थ्यांना भूगोल विषयाची अधिक सखोल समज मिळेल आणि त्याचा त्यांना भविष्यात नक्कीच उपयोग होईल. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टीलचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वाचा ठरेल.
पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी शिक्षण क्षेत्रात सातत्याने योगदान देत असून, स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणसाहित्य आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याआधीही कंपनीने शाळांना संगणक, शालेय साहित्य, तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. कंपनी केवळ भौतिक साहित्य किंवा भौतिक सुविधा पुरवण्यावर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मानस पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.