पोलीस अधीक्षकांच्या “माऊली स्कॉड” ची दमदार कामगिरी!१५६ संशयित ताब्यात, २१ आरोपींना अटक; १६ गुन्ह्यांचा छडा, १७.९९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..

सोलापूर
प्रतिनिधी : उमेश वाघमारे

आषाढी वारी २०२५ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ‘माऊली स्कॉड’ ही कल्पक संकल्पना यशस्वीरित्या राबवण्यात आली. या स्कॉडने आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे १६ गुन्ह्यांचा छडा लावत १७,९९,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एकूण १५६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वारकरी वेशात सजलेल्या ‘माऊली स्कॉड’ने गर्दीतील गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवून कामगिरी बजावली. चैन स्नॅचिंग, खिसेकापू, मंगळसूत्र चोरीसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी या पथकाने उल्लेखनीय प्रयत्न केले. या स्कॉडमध्ये सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे ४ अधिकारी व ४१ अंमलदार, तसेच पंढरपूर शहर पोलिसांचे १ अधिकारी व १३ अंमलदार कार्यरत होते.
‘माऊली स्कॉड’ने महाराष्ट्रातील नामांकित गुन्हेगारांची यादी, फोटो व माहिती आधीच संकलित करून डिजिटल स्वरूपात तयार केली होती. या माहितीचा वापर करुन संबंधितांचे हालचाल लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करण्यात आली.
दि. ३० जून रोजी श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी व दि. १ जुलै रोजी श्री. तुकाराम महाराज पालखीच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशानंतर, स्कॉडने विविध ठिकाणी गुप्त निगराणी ठेवत संशयितांना रंगेहाथ पकडले. मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना जागीच परत देण्याची पारदर्शक प्रक्रिया राबवली गेली.
या कालावधीत एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील १६ गुन्ह्यांचा छडा लागला आहे. २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २०० ग्रॅम सोन्याचे दागिने – चैन, मंगळसूत्र, अंगठ्या इत्यादी – हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ‘माऊली स्कॉड’ ही संकल्पना आषाढी वारीतील भाविकांच्या सुरक्षेसाठी एक यशस्वी पाऊल ठरली आहे.