गोळीबारावेळी आरोपींच्या हाती पिस्तूल, तरीही पोलीस अधिकारी राजेंद्र दाभाडे डगमगले नाहीत; बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना जीवाची बाजी लावून पकडलं…!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलीस अधिकारी राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने पकडले. राजेंद्र दाभाडे हे मुंबईतील निर्मलनगर ठाण्यामध्ये एपीआय असून त्यांनी जीवाची बाजी लावून दोन्ही आरोपींना पकडलं आहे.

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी राजेंद्र दाभाडे हे त्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी तैनात होते. बाबा सिद्दिकींवर गोळीबार होताना पाहिल्यानंतर एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी आरोपीच्या हातात बंदूक असतानादेखील धाडस दाखवलं आणि दोन आरोपीना पकडले. यातील एक आरोपी हा गर्दी आणि फटाक्यांच्या धुराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. सध्या बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेची टीम अधिक तपास करत आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून 15 टीम तयार करण्यात आल्या आहेत.

बाबा सिद्दिकींची हत्या लॉरेन्स बिष्णोई गँगनं केली का याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. बाबा सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती, त्यांना नेहमीची सुरक्षा असून त्यांच्या सुरक्षेत तीन पोलिस कॉन्स्टेबल तैनात असतात, असंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सिद्दिकींच्या हत्येचा कट हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये शिजल्याचं समोर आलं आहे. इथेच तीनही आरोपींची भेट झाल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. फरार आरोपी शिवासह हे तिघेही 2 सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. या वेळी जुहू बीचवर गेलेल्या या तिन्ही आरोपींनी आठवण म्हणून फोटो काढला होता. यातील एका आरोपींच्या मोबाइलमध्ये हा फोटो सापडल्याने इतर सर्व आरोपींची ओळख पटवणं सोपं झालं. यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 28 जिवंत काडतूसं, दोन मोबाईल जप्त केले आहेत.

यातील एक मोबाइल हा फक्त कॉलिंगसाठी होता. तर दुसरा नियमीत वापरासाठी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट