पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

उपसंपादक -मंगेश उईके
पालघर



आरोग्य, शिक्षण ,मुलभूत व पायाभूत सुविधा या मधील कामे प्राधान्याने पूर्ण करा
*.....पालकमंत्री गणेश नाईक*
पालघर दिनांक २१: वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे संपन्न झाली.
या बैठकीस खा. सुरेश म्हात्रे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे , आ. राजेंद्र गावीत आ. दौलत दरोडा , आ . शांताराम मोरे ,आ. विलास तरे आ. विनोद निकोले , आ. हरिश्चंद्र भोये आ. स्नेहा दुबे पंडित , आ. श्री. राजन नाईक , तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़, , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे ,पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी, अपूर्वा बासुर, , जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दि. 05/02/2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना) सन 2024-25 च्या अंतिम सुधारित तरतुदीस मान्यता देण्यात आली. सन 2024-25 अंतर्गत आदिवासी उपयोजनांतर्गत रु.1.21 कोटी व सर्वसाधारण अंतर्गत 2.20 कोटी असा एकूण रु. 3.41 कोटी निधी तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यार्पित झाला असून उर्वरित निधी संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष कामे करण्याकरिता अदा करण्यात आलेला आहे.
जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना) सन 2024-25 अंतर्गत माहे जून, 2025 अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. सन 2024-25 अंतर्गत अनुक्रमे रु. 329.50 कोटी, रु. 345.00 कोटी, रु. 14.00 कोटी असा एकूण रु. 688.50 कोटी निधी अर्थसंकल्पित झाला असून एकूण रु. 685.09 कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना मंजूर कामाच्या पुर्ततेसाठी निधी अदा करण्यात आलेला आहे, त्यापैकी अनुक्रमे रु. 214.94 कोटी, रु. 224.62 कोटी, रु. 5.08 कोटी असा एकूण रु. 444.64 इतका निधी कामे पूर्ण करून प्रत्यक्ष खर्च करण्यात आलेला आहे. उर्वरित निधीची कामे त्वरीत पूर्ण करून निधी 100% खर्च करण्याबाबत संबंधित यंत्रणांना पालकमंत्री गणेश नाईक यांनी निर्देश दिले.
जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना) सन 2025-26 अंतर्गत अनुक्रमे रु. 410.13 कोटी, रु. 375.00 कोटी, रु. 14.00 कोटी असा एकूण रु. 799.43 कोटी निधी अर्थसंकल्पित झाला आहे. सदर निधी प्रत्येक तालुक्यातील लोकसंख्या, तालुक्यातील प्रमुख समस्या आणि कामाची गरज व निकड लक्षात घेता सर्व तालुक्यांना समन्याय पद्धतीने आरोग्य, शिक्षण आणि
मुलभूत व पायाभूत सुविधा या मधील कामे प्राधान्याने करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.
डहाणू वनविभागामार्फत बांबू पासून समृद्धीकडे या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच पालघर येथे वन विभागाच्या 93.4 हेक्टर शासकीय जागेवर भविष्यातील झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाचा विचार करून पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक तत्वावर आधारित वन उद्यानाचा प्रस्तावित मसुदा सादर करण्यात आला.