ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम पिडीत व्यक्तीस १२ तासाचे आत परत मिळवून देण्यात पालघर पोलीस दलास यश..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.

दिनांक १३/०७/२०२५ रोजी १७:३० वाजता इसम नामे श्री. भास्कर दामोदर जाधव, वय ५५ वर्ष, रा.आगरआळी वाडा, ता. वाडा, जि. पालघर यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या SBI Yono app मधुन त्याच्या फिक्स डिपॉझीट मधिल रक्कम अनोळखी व्यक्तीच्या अकाऊंटवर ऑनलाईन ट्रान्सफर होत असल्याबाबत तक्रार देणेसाठी वाडा पोलीस ठाणे येथे गेले होते. त्यांच्याकडे वाडा पोलीसांनी विचारपुस केली असता तक्रारदार यांनी सांगीतले की, त्यांनी सर्व प्रथम google वर Yono app update-2025 असे search केले असता त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला. त्या वेळी समोरुन एक पुरुष इसम (स्कॅमर) बोलत होता. त्या इसमाने तक्रारदार यांना सांगीतले की, Yono app update कसे करावे याची माहीती दिली. तसेच तूमचा व्हॉट्सअप नंबर हाच आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर स्कॅमरने तक्रारदार श्री. भास्कर जाधव यांचे व्हॉट्सअपवर ७५००८६२३०४ या मोबाईल क्रमांकाने मेसेज करुन एक APK file Download करायला सांगुन त्यातील फॉर्म भरायला सांगीतला. तक्रारदार यांनी तो फॉर्म अर्धवट भरला व त्यांना संशय आल्याने फॉर्म भरण्याचे बंद केले. त्यानंतर श्री. भास्कर जाधव यांचे मोबाईलमध्ये असणारे Yono app उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ते बंद दाखवले. त्यांनी SBI कस्टमर केअर यांच्या १८००१२३४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला असता त्यांना त्यांचे Yono app लॉक झाले असुन २४ तासा नंतर उघडले जाईल असे सांगीतले. त्यानंतर लागलीच स्कॅमरने तक्रारदार यांच्या मोबाईलवर कॉल करुन तूमचे Yono app उघडत नसेल तर तो अर्धवट भरलेला फॉर्म पुर्ण भरून मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तक्रारदार यांनी तो फॉर्म पुर्ण भरला. पुन्हा तक्रारदार यांना स्कॅमरने कॉल करुन तूमचा पासवर्ड जनरेट होत नसेल. तूम्हाला एक व्हॉट्सअप कॉल येईल, तो उचला व त्यामध्ये पासवर्ड जनरेट करण्याची प्रोसेस सांगीतली जाईल असे सांगीतले. त्यानंतर तक्रारदार यांना एक व्हॉट्सअप कॉल आला. तो तक्रारदार यांनी उचलताच त्यांच्या SBI Yono app मधुन पैसे अनोळखी व्यक्तीच्या अकाऊंटवर जायला सुरुवात झाली. तक्रारदार यांचे अकाऊंट मधुन अनुक्रमे १,९५,००० रुपये, १,८०,००० रुपये, १,२०,००० रुपये, व ५०,००० रुपये असे एकुण ५,४५,०००/- रुपये ट्रान्सफर झाले.
सदर तक्रारदार यांची आर्थिक फसवणुक होताच ते तात्काळ वाडा पोलीस ठाणे येथे आले. त्यावेळी वाडा पोलीस ठाणेचे मपोउपनि/पल्लवी बाणे यांनी सायबर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी मपोउपनि/रूपाली गुंड यांचे मदतीने गोल्डन अवर (एक तास) मध्ये नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर तक्रार दाखल केली तसेच SBI बँकेच्या कस्टमर केअर यांना कळवून सदरचा संशयीत
आरोपीचे अकाउंटचे व्यवहार थांबविला. त्यानंतर तांत्रीक मदतीच्या सहाय्याने तक्रारदार यांचे स्कॅमरच्या अकाऊंटवर ट्रान्सफर झालेले एकुण ५,४५,०००/- पैकी ४,९५,०००/- रुपये तक्रारदार श्री. भास्कर दामोदर जाधव यांना १२ तासांचे आत परत मिळवुन देण्यात यश आले आहे.
सदरची कामगीरी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. गणपत पिंगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे, पोउपनिरी/पल्लवी बाणे, पोउपनिरी/सुमेध मेढे, पो.शि./ चेतन सोनावणे नेमणुक वाडा पोलीस ठाणे, पोउपनि/रुपाली गुंड पोशि/रामदास दुर्गेष्ट, पोशि/महादेव सांगवे नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी केली आहे.