नक्षलवाद्यांना ७ गावांत प्रवेशबंदी , दहशत झूगारून गावकऱ्यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गडचिरोली :-कोणत्याही नक्षलवाद्यास जेवन, रेशन, पाणी गावकऱ्यांमार्फत दिले जाणार नाही. त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही.
गडचिराेली : गेल्या ४० वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या दहशतीत जीवन जगणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील ७ दुर्गम गावांनी नक्षलवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे.

अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील या गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव धाेडराज पाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे सादर केला.

ही सातही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अबुझमाड परिसराला लागून आहेत. या गावांमध्ये नक्षलवाद्यांचे वर्चस्व होते, तसेच गावातील काही सदस्यांचा नक्षलवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. मागील तीन वर्षांमध्ये गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे आयाेजित केले.

येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाप्रती गावक­ऱ्यांचा विश्वास दृढ झाला. अलीकडील काळात या परिसरात इरपनार येथे ‘मोबाइल टॉवर’ची उभारणी करण्यात आली. सात गावांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयासाठी उपअधीक्षक अमर मोहिते, धोडराजचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी पुढाकार घेतला.

गावकऱ्यांच्या ठरावातील अटी कोणत्याही नक्षलवाद्यास जेवन, रेशन, पाणी गावकऱ्यांमार्फत दिले जाणार नाही. त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही. गावातील नागरिक स्वतः किंवा त्यांच्या मुलाबाळांना नक्षलवादी संघटनेत सहभागी करून घेणार नाही. त्यांचे कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांचे प्रशिक्षण करणार नाही.

नक्षलवाद्यांच्या बैठकीला जाणार नाही. त्यांच्या खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असे ठरावात म्हटले आहे. धोडराज हद्दीतील गावांनी नक्षल गावबंदी केल्यामुळे मिडदापल्ली गावातील नागरिकांनी जंगल परिसरात पोलीस पथकासाठी केलेले खड्डे बुजवून त्यातील लोखंडी सळया (सलाखे) काढून पोलिसांना दिले. इतर गावातील नागरिकांना देखील पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
नक्षलवाद्यांकडून पोलीस खब­ऱ्या असल्याच्या संशयावरून निष्पाप गावक­ऱ्यांच्या हत्या व मारहाण केली जात हाेती. नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक आदी घटनांमुळे नक्षलवादी जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. इतर गावांनीही निर्भयपणे विकासाची वाट निवडावी.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट