माझी मुलगी वनिता राठोड हिची हत्या तिचा पती दिलीप राठोड यांनीच करुन बनाव केल्याचा आरोप वडील श्री. जगन्नाथ वडते यांनी केला ..!

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

सातारा :-दिनांक ४.३.२०२४ रोजी पोलीस अधिक्षक सातारा यांना वनिता राठोड हिचे वडिल जगन्नाथ हिरामण वडते रा. नागलवाडी तांडा ता. शेवगाव जि. अहमदनगर यांनी तक्रार अर्ज दिला आहे.

त्यांत त्यांनी अशी तक्रार केली आहे कीं, दिलीप बबन राठोड वनिताचे पती यांनी वनिताला दि. २७.२.२०२४ रोजी रात्री ९ ते ४ वेळेत घातपात करून मारले आहे. पी. एम रिपोर्ट सुध्दा Death due to Head Injury असा आहे.

वनिता राठोड व तिचा नवरा दिलीप बबन राठोड हे सातारा येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. वनिताचे माहेर शेगांव तालुक्यातील असून जवळच्या पाथर्डी तालुक्यांतच तिचे सासर आहे. आठ वर्षापूर्वी लग्न झाले होते. एक मुलगा व एक मुलगी आहे. सर्व ऊस तोडणी मजूरानी, मुकादम, कारखान्याचे अधिकारी, या सर्वाच्या दबावात येवून खोटी जबानी पोलीसात दिली आहे की, वनिता ही दि. २७.२.२०२४ तारखेला ट्रॅक्टरच्या सिडीवरून पाय घसरून पडली व मेली. अशी जबानी दिली आहे.

परंतु ही जबानी खोटी असल्याचे वनिताचे वडिल जगन्नाथ हिरामण वडते यांचे म्हणणे आहे. कारण वनिताने वडिलांना फोन करून सांगतीले होते की, मी २७.२.२०२४ या तारखेला पूर्ण दिवसभर घरीच आहे, कारण पतिने मला खूप मारहाण केली असल्याने मला उभेही राहता येत नाही. त्यामुळे खोटी साक्ष देणारे सर्व ऊस तोडणी मजूर, त्यांचे नातलग, कारखान्याचे अधिकारी, मुकादम यांचे फोन कॉलस् डिटेल घ्यावेत. सीडीआर ताब्यात घ्यावेत अशी मागणी वनिताचे वडिलांनी पोलीस अधिक्षक कार्यालय सातारा यांचेकडे केली आहे. तसेच व्हिसेरा डिएनए तपासणीसाठी पाठवावा अशीही मागणी केली आहे.

दिलीप बबन राठोड यांने वनिताचे वडिल जगन्नाथ वडते याला दि. २७.२.२०२४ रोजी रात्री ९.०० चे दरम्यान फोन वरून धमकी दिली होती कीं, मी वनिताला ठार मारणार आहे. तसेच तुम्हालाही ठार मारणार आहे. तद्नंतर दि. २८.२.२०२४ रोजी दिलीप बबन राठोड यांनी वनिताचे वडिल जगन्नाथ वडते यांना पहाटे चार वाजतां फोन लावला व फोनवर दिलीप राठोडचे भाऊ मिथून राठोड बोलला की, वनिता मयत झाली आहे. आपण विधीसाठी कोकीसपिर तांडयावर यावे. त्यानंतर वनिताचे वडिल व भाऊ यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना वनिता मयत झाल्याचे कळविले. मात्र दिलीप राठोड यांनी दि. २८.२.२०२४ ला सकाळी ८.०० वाजतां वनिताला चक्कर येते म्हणून सातारा येथील सिव्हिल मध्ये नेली व सिव्हिल मध्ये डॉक्टरने वनिता दवाखान्यात येणे आगोदरच मृत झाली आहे असे घोषित केले.

लगेच तातडीने २-३ तासातच सर्व ऊस तोडणी मजूराच्या प्रत्यक्षदर्शी म्हणून खोटी जबानी घेण्यात आली. कोणतीही माहिती घेत असताना त्या ठिकाणी वनिताचे आई, वडिल, भाऊ, बहिण यांना पोलीसाने कळविले नाही. तसेच मुकादम व कारखान्याचे अधिकारी यांनी दबाव टाकून मजूराना खोटया जबानी द्यावयाला लावून वनिताचा खून दडपण्याचा प्रयत्न केला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. फिर्याद देवू नये म्हणून वनिताच्या वडिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधीत दोषीवर ३०२, ३४ मनुष्यवधाचा गुन्हा व गुन्हेगारास सहकार्य करण्याचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी पोलीस अधिक्षक सातारा यांच्याकडे वनिताचे वडिल जगन्नाथ हिरामण वडते यांनी तक्रारी अर्ज करून केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट