मौजे सारणी, कासा परिसरात व्हायरल झालेल्या अफवांची पालघर पोलीसांनी केली शहानिशा.

0
Spread the love

उपसंपादक, : मंगेश उईके

पालघर

दिनांक १४/०७/२०२५ रोजी मौजे सारणी, कासा परिसरात एक काळ्या रंगाची स्कॉर्पीओ संशयीतरित्या फिरत असून त्यात ३/४ इसम तोंडावर मास्क लावलेले असून शाळेत जाणारे मुलांना जबरदस्तीने गाडीत बसवित असले बाबत एक संदेश सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. सदर संदेशाची पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख यांनी त्वरित दखल घेवून कासा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सदर व्हायरल संदेशाची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख यांची त्वरित सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला. त्यामध्ये पालघर पोलीस सदर घटनेचा तपास करीत असून त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल असे नागरीकांना सांगुन शांतता राखण्याचे तसेच सदर बाबत काहि माहिती मिळाल्यास पोलीसांना अवगत करण्याचे आवाहन केले होते.

पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या आदेशानुसार कासा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोनि/अविनाश मांदळे यांनी त्वरीत या घटनेची दखल घेवून एक पथक तयार करून गौजे सारणी, निकावली गाव येथे भेट देवून तेथील सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक ग्रामस्थ, आजुबाजुच्या गावचे ग्रामस्थ यांची बैठक घेवून नागरिकांना शांतता राखणेचे आवाहन करून कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाहीत याबाबत सुचना दिल्या.

कासा पोलीस ठाणेचे पथकाने घटनास्थळ आणि आजूबाजूचे परिसरात तांत्रीक तपासाच्या आधारे सारणी गाव परिसरात आलेली काळ्या रंगाच्या गाडीचा शोध लावला असता सदर गाडी काळ्या रंगाची स्कॉर्पीओ तीचा क्रमांक DD-03-AQ-0002 असल्याचे निष्पन्न झाले. सदर गाडी व गाडी मालकाचा शोध घेतला असता गाडीचे मालक हे चेतन रमेश पटेल, वय ३८ वर्षे, रा. चेलाडोंगर फलिया, पोस्ट ऑफिस जवळ, वापी, गुजरात असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर इसम यांचे घरी जाऊन खात्री केली असता ते घरी मिळून आले. तसेच नमूद क्रमांकाची गाडीसुध्दा मिळून आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते दिनांक १४/०७/२०२५ रोजी सप्तशृंगी माता मंदिर येथे गरजू लोकांना छत्री, चप्पल, बिस्कीट, स्कुल बॅग इत्यादी साहित्य वाटगेसाठी आले असल्याचे निष्पन्न झाले. ते वर्षातुन ३/४ वेळा मंदिरात येवून साहित्य वाटत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सप्तशृंगी माता मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थ यांनीसुध्दा त्यास दुजोरा दिला आहे. सदर इसम आणि कुटुंबीय यांचे वर्तनाबाबत वापी पोलीस ठाणे येथे जावून चौकशी केली असता त्याचेविरुध्द कोणतेही गुन्हे अथवा तक्रारी नसल्याचे आढळले.

पालघर पोलीसांकडून व्हायरल संदेशामधील घटनेची पडताळणी करण्यात आली असून त्यात नमूद असा कोणताही प्रकार घडलेला नाही. त्यामूळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट