महाड तालुक्यातील जिते गावात 25 वर्षीय विवाहित रूपाली कासारेची गळफास घेऊन आत्महत्या.
उपसंपादक-राकेश देशमुख
महाड
एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद…
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील जिते गावामध्ये एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. रूपाली विपुल कासारे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव असून घरामध्ये कोणीही नसताना मयत रूपाली हिने घराचे किचन रूम मधील लाकडी भालाला साडीच्या साह्याने स्वतःच्या मानेला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरची घटना मौजे जिते गावातील दिलंनवाज काझी यांच्या चाळीत घडली असून मयत रूपाली व तिचा पती हे दोघेही या चाळीमध्ये भाड्याने राहत होते. मयत रूपाली कासारे वय 25 वर्ष मूळ राहणार दाभट, पोस्ट लाटवण, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील रहिवाशी असून सदरचे कुटुंब एमआयडीसी मध्ये कामानिमित्त आलं होतं. रूपाली हिने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट असून दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास रूपाली ही गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना आढळली. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.