महाड शहरामध्ये पुन्हा चाकू हल्ला करून जबरी चोरी…

उप संपादक-राकेश देशमुख


महाड ;*पोलिसांनी काही तासातच दोघा आरोपींना ठोकल्या बेड्या..*महाड शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरीच्या घटना वारंवार होत आहेत. नुकतीच महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घरफोडीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा चाकू हल्ला करून जबरी चोरी करण्यात आली आहे. फिर्यादी बबलूकुमार विश्वनाथ साह यांनी याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी बबलू कुमार व त्याचे दोन भाऊ महाड शहरातील दुध डेअरीच्या मोकळ्या जागेत एसटी गॅस पंप शेजारी पत्र्याचे शेड टाकून कामानिमित्त राहत होते. रात्रीच्या वेळेस दोन अज्ञात चोरट्याने त्या ठिकाणी प्रवेश करून फिर्यादी व त्याच्या दोन भावांना चाकू व हाताबुक्याने मारहाण करून जखमी केले व त्यांच्याकडील ओपो कंपनीचा मोबाईल आणि रोख 1200 रुपये घेऊन चोरटे लंपास झाले. महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत काही तासातच दोघा आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. आरोपी ओम राजू जाधव व समीर संभाजी कदम राहणार काकरतळे, तालुका महाड यांना पोलिसांनी अटक केली असून आरोपींना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. महाड शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 309(6),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.