मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
उपसंपादक -मंगेश उईके
पालघर,
दि. 25:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत "राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व" च्या अनुषंगाने दि.२६ जून, २०२५ ते दि.०४ जुलै, २०२५ या कालावधीत राज्यातील इ.११ वी व इ.१२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने इ.११ वी व इ.१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी/सीईटी दिलेल्या/डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी दि.२६ जून ते दि.०४ जुलै २०२५ या कालावधीसाठी विशेष त्रुटी पूर्तता मोहिम राबविण्यात येणार आहे.
सन २०२५-२६ वर्षामधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी इच्छुक आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर येथील कार्यालयात प्रस्ताव दाखल करुन पावतीच्या आधारे प्रवेश निश्चित केल्यानंतर अद्यापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या सर्व उमेदवारांसाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर कार्यालयात त्रुटी पूर्तता कक्ष आहे. अर्जदारास ई-मेलवर समितीकडून कळविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी उपरोक्त विद्यार्थ्यांनी आपले जातीच्या संदर्भातील वडिलांकडील नातेवाईकांचे मानीव दिनांकापूर्वीची कागदपत्रे व नातेसंबंध सिध्द करणेसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे मूळ व साक्षांकित छायाप्रतींसह घेऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात शालेय सर्व मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे.
आपल्या प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करावी. त्रुटी पूर्तता केलेल्या प्रकरणावर समितीकडून तत्काळ कार्यवाही करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्रुटी पुर्ततेअभावी प्रकरणे अर्जदार स्तरावर प्रलंबित राहिल्यास त्यास अर्जदार स्वतः जबाबदार राहणार आहेत.
या विशेष मोहिमेमध्ये अर्जदार यांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणांची त्रुटी पूर्तता करुन घ्यावी, जेणेकरुन संबंधित अर्जदार यांना वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे समितीस सुलभ होईल. असे आवाहन अध्यक्ष, श्री. रामदास खेडकर, उपायुक्त तथा सदस्य, श्रीम. सलीमा तडवी व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, श्री. पांडुरंग वाबळे यांनी केले आहे.