कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस सश्रम कारावासासह जन्मठेपेची शिक्षा..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
सदर घटना ही कात्रज कोंढवा रोड, केसर लॉजच्या मागील मोकळया मैदानात, गगन उन्नती सोसायटी समोर, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे दिनांक २२/०६/२०१९ रोजी यातील आरोपी तपिश पुखराज चौधरी, वय २६ वर्षे, रा. गगन उन्नती सोसायटी, ईस्कॉन मंदिराशेजारी, कोंढवा, पुणे याने त्याचे मोबाईलवरुन सिद्धार्थ सिंग या नावाने सुनिल रघुनाथ शास्ती, वय ५२ वर्षे, रा.प्लॉट नं. ६३. घरकुल प्रॉपर्टीज, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे हे ड्रायव्हर असलेली ओला (ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज प्रा.लि.) कंपनीची स्विफ्ट डिझायर कार क.MH-12-QG-8987 ही कार प्रवासी म्हणून बुक करुन त्या कारमध्ये बसून कात्रज कोंढवा रोड, केसर लॉजच्या मागील मोकळ्या मैदानात, गगन उन्नती सोसायटीसमोर, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे जाऊन कापडी गमच्याच्या साहाय्याने सुनिल शास्त्री (मयत) यांचा गळा आवळून त्यांचा खून करुन त्यांचा मृतदेह तेथेच मैदानामध्ये टाकून देऊन सुनिल शास्त्री यांचे ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार जबरी चोरी करुन घेऊन गेला व सदर कार बुक करण्यासाठी वापर केलेले सिमकार्ड व सुनिल शास्त्री (मयत) यांचा गोबाईल फोन फेकून पुरावा नष्ट केला. म्हणून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ५६१/२०१९ भा.दं.वि. कलम ३०२,३९७,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, सध्या नेमणूक फरासखाना पोलीस ठाणे यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. ११६०/२०१९ असा आहे.
वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक ०७/०४/२०२५ रोजी सश्रम कारावासासह जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. मिलींद दातरंगे व श्री. प्रदिप गेहलोत, कोर्ट पैरवी सहा. पोलीस फौज. महेश जगताप, यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी सहा. पोलीस फौज. महेश जगताप व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.