खावडा ट्रान्समिशन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात टीएलआर सर्व्हे वेगाने सुरू…

उपसंपादक -मंगेश उईके
पालघर :

टीएलआर सर्व्हे प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांपर्यंत योग्य भरपाई वेळेत पोहोचेल..!
मुसळधार पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, आणि जव्हार तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात टीएलआर (तालुका भूमी अभिलेख निरीक्षक) सर्व्हे जोरात सुरू आहे. खवडा प्रकल्पासाठीच्या जमीन भरपाई दरांची अंतिम ठरवण होण्याआधीचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
हा प्रकल्प रेसोनिया लिमिटेड (पूर्वी स्टरलाइट पावर ट्रांसमिशन लिमिटेडचा पायाभूत सुविधा विभाग) कंपनीकडून उभारण्यात येत आहे. या अंतर्गत ग्रीन एनर्जी ट्रान्समिशनसाठी जमिनीच्या हक्कसंपादनाचा आणि वीज वाहिन्या टाकण्याचा मार्ग खुला करण्याचे काम सुरू आहे. गुजरातमधील कच्छ प्रदेशातून, जिथे भारतातील सर्वात मोठे सौर आणि हरित ऊर्जा प्रकल्प आहे, वीज वाहतूक करण्यासाठी ही पायाभूत यंत्रणा उभी राहणार आहे. महाराष्ट्रात विजेच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे आणि राज्य आपल्या ऊर्जा निर्मिती क्षमतेत झपाट्याने वाढ करत असला तरी तुटवडा अजूनही कायम आहे. राज्य सरकारचे कर्मचारी अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन जोरदार पावसातही सर्वेक्षणाचे काम करत आहेत, जेणेकरून नियोजित वेळेत काम पूर्ण करता येईल. दरम्यान, रेसोनिया कंपनीचे प्रतिनिधीही टीएलआर प्रक्रियेच्या जलद पूर्ततेसाठी प्रयत्नशील असून, त्यांनी लाभार्थ्यांना अर्ज लवकर सादर करण्याचे आवाहन केले आहे.
“ही प्रक्रिया पारदर्शक आणि गतीमान ठेवणे महत्त्वाचे आहे. TILR प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास भरपाई योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल,” असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. “जर आताच सहभाग दिला नाही तर नंतर लाभ घेण्यासाठी संबंधितांना हेलपाटे मारावे लागतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी यंत्रणा आणि खासगी कंपनी यांच्यात योग्य समन्वय साधला गेल्याने, येणारे काही आठवडे या महत्वाकांक्षी हरित ऊर्जा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक ठरणार आहेत.