होळीच्या निमित्ताने पोस्को महाराष्ट्रचा सृजनशील उपक्रम- वारली चित्रांनी नटली तासगांव आदिवासीवाडी!

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :-पोस्को महाराष्ट्र स्टीलने त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उक्रमांतर्गत पारंपरिक वारली चित्रकलेचा एक प्रेरणादायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध उपक्रम तासगाव आदिवासीवाडीत राबवला. यामुळे गावातील सांस्कृतिक परंपरांचे रूप अधिक सजीव झाले आहे.

या उपक्रमांतर्गत, समाजमंदिर आणि आजूबाजूच्या ११ घरांच्या भिंती पारंपरिक वारली चित्रकलांनी सुशोभित करण्यात आल्या. आदिवासी जीवनशैली, निसर्गाशी असलेले नाते, तसेच पारंपरिक सण-उत्सवांचे सौंदर्य या कलांमधून सहज उलगडले. यासोबतच, औषधी वनस्पतींच्या महत्त्वाची पुनर्उजळणी करत परिजातक, वेखंड, अश्वगंधा, तुळस, गवती चहा, कोरफड यांसारख्या वनस्पतींची रोप देण्यात आली. वारली कला ही आदिवासी संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे आणि या उपक्रमाने तिच्या जतनासाठी एक नवा दृष्टीकोन दिला आहे.

१० मार्च २०२५ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन आदिवासी नृत्याने सुरुवात करत मोठ्या उत्साहात पार पडले. पोस्को महाराष्ट्र स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वू सुक चोई, संचालक श्री. जी युन पार्क आणि इतर वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला हजर होते. स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी, आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही वारली कलेच्या अनुभवामध्ये सहभागी होत आदिवासी संस्कृतीशी जवळीक साधली.

गावकऱ्यांच्या भावना या कार्यक्रमात प्रकर्षाने उमटल्या. “या उपक्रमामुळे आमच्या घरांचे रूप पालटून गेले आहे. लुप्त होत चाललेल्या वारली कलेच्या संवर्धनासाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे मुलांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग गवसेल,” असे त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.

पोस्को महाराष्ट्र स्टीलने राबविलेल्या या उपक्रमाने गावाचा चेहरामोहराच बदलला नाही, तर वारली कलेच्या जतनाचा आणि संवर्धनाचा एक आदर्श घालून दिला आहे. ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या कलेचा वारसा जपण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.

कंपनीने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक संस्कृती संवर्धनासाठी आपल्या सामाजिक जबाबदारीचा मोठा हिस्सा उचलला आहे. “वारली चित्रकलेसारख्या उपक्रमांद्वारे समाजाला प्रेरणा देणे आणि त्यांना एकत्र आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी ठामपणे व्यक्त केले.

तासगाव आदिवासीवाडीला नवा चेहरा मिळवून देणाऱ्या या उपक्रमाने पोस्को महाराष्ट्र स्टीलचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठीचा कटिबद्ध दृष्टिकोन अधोरेखित केला आहे. भविष्यातही अशा सृजनशील उपक्रमांसाठी ते सतत प्रयत्नशील राहतील, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट