बालविवाह मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी ग्रामसेवकांनी स्वयंस्फूर्तीने उपक्रम राबवावेत – जि. प.अध्यक्ष प्रकाश निकम…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :-पालघर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासन आपापल्या स्तरावर योग्य त्या उपाययोजना राबवत आहेच, परंतु खऱ्या अर्थाने देशासाठी
काही योगदान द्यायचे असेल तर बालविवाह मुक्त ग्रामपंचायत असा कार्यक्रम आपण स्वयंस्फूर्तीने हातात घेतला पाहिजे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्ह्यातील ग्रामसेवकांना केले.

आज दिनांक 15/7/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय पालघर बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 व नियम 2022 अन्वये बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक, (ग्राम स्तर) बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी स्तर) यांचे कायदेविषयक प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
बालविवाह हद्दपार करायचे असल्यास त्या त्या गावातील प्रिंटिंग प्रेस यांना पत्रिका छापण्या अगोदर वधू व वर यांची जन्मतारीख तपासणे बंधनकारक करण्यात यावे अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याचप्रमाणे लग्न लावणारे भटजी, बस्ता बांधणारे दुकानदार,मंडप मालक, यांच्यावरही याप्रमाणे कारवाई करावी यामुळे बालविवाहाला बऱ्यापैकी आळा बसेल, असे प्रतिपादन यावेळी अध्यक्ष निकम यांनी केले. खोडाळा न्याहळे येथील बालविवाहामुळे घडलेली घटना डोळ्यासमोर ठेवून आपापल्या ग्रामपंचायत मध्ये बालविवाहामुळे होणारे परिणाम समजावून सांगावेत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तुळशी विवाहा नंतर जिल्ह्यातील आदिवासी वारली बांधव विवाह करतात, त्यावेळी ही कार्यशाळा तालुकास्तरावर आयोजित करण्यात यावी असे त्यांनी सुचित केले.

ग्रामसेवकांना यावेळी आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये 200 उपयुक्त झाडे लावण्याचे आव्हान देखील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.
या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक असलेले विधायक भारती संस्थेचे संतोष शिंदे यांनी उपस्थित ग्रामसेवक व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 व नियम 2022 ची रूपरेषा व प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली, यामध्ये ग्रामसेवकांची भूमिका, संबंधित कायद्याबाबतची जनजागृती, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी बालकल्याण समिती अध्यक्ष राजकन्या अडुळे, माजी बालकल्याण समिती अध्यक्ष शारदा शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, डॉ.तन्वीर शेख, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी,ग्राम विस्तार अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
जिल्हा बालक संरक्षण अधिकारी विनोद राठोड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com