फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी “एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड” वर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा धडक मोर्चा..

सह संपादक – रणजित मस्के
मुंबई
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मधील मुंबईसह देशभरातील किमान बावीस हजार युवा फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या भवितव्यासाठी आंदोलन छेडणार : खा. अनिल देसाई यांचा ईशारा

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मधील देशभरातील किमान २२ हजार युवा फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती व एव्हीएशन कामगार सेनेच्या माध्यमातून सातत्याने व्यवस्थापणाबरोबर मिटिंग घेऊन देखील कामगारांचे प्रश्न सोडवण्यात व्यवस्थापनाला कोणताही रस नसल्याचे व्यवस्थापनाने वारंवार दाखवून दिलेले आहे. मागील भरतीच्या गोंधळाचा व्हिडीओ प्रसारमाध्यमानी दाखवल्यावर व्यवस्थापनाला याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना नेते सचिव खा. अनिल देसाई साहेब यांच्या नेतृत्वात महासंघाचे शिष्टमंडळ फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन गेलेले होते. यात प्रामुख्याने कायमस्वरूपी नोकरी, पगारवाढ, बढती, अपघाती रजा, ओव्हर टाईम, युनिफॉर्म डिपॉजिट रद्द, चुकीची डी रोस्टर प्रक्रिया,कामगारांना मिळणारी चुकीची वागणूक, कामगार कायदयाची व्यवस्थापणाकडून होणारी पायमल्ली याबद्दल चर्चा करण्यात आलेली होती व त्यावेळी AIASL चे महाप्रबंधक श्री.जयगोपाल, उप महाप्रबंधक श्री.प्रशांत नेवे मानवी संसाधन विभागाच्या सहाय्यक महा प्रबंधक श्रीमती सुनीता भारद्वाज यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल अशी विनंती करून वेळ मारून नेलेली व श्रीमती सुनीता भारद्वाज यांनी शिवसेना नेते सचिव खा. अनिल देसाई यांना विनंती केलेली होती कि,मी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात महासंघाचे सरचिटणीस श्री. प्रदिप मयेकर यांच्याशी चर्चा करून कामगारांचे प्रश्न मार्गी लावेन परंतू त्यानंतर मानवी संसाधन विभागातील अधिकारी श्रीमती सुनीता भारद्वाज यांनी मिटिंगसाठी वेळ सुद्धा दिला नाही व कोणताही संपर्क ठेवला नाही व्यवस्थापनाच्या या कार्यपद्धतीचा जाहीर निषेध करून व्यवस्थापणाला वठणीवर आणण्यासाठी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा धडक मोर्चा शिवसेना नेते सचिव अनिल देसाई यांच्या नेतृत्वात बुधवार दि. २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता मेडिकॉन भवन, सहार पोलीस स्टेशन जवळ एअरपोर्ट गेट नंबर ५, सहार, अंधेरी पूर्व मुंबई ४०००९९ येथून निघणार आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातील संलग्न असलेल्या सर्व आस्थापनातील समिती च्या पदाधिकाऱ्यांना व सभासदांना या मोर्चासाठी हजर राहणे अनिवार्य आहे असे महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई यांनी आवाहन केले आहे.