बंदोबस्तावर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविले ममत्व:महिला भाविकाच्या 4 वर्षाच्या मुलाचा सांभाळ…

प्रतिनिधी-रणजित मस्के
हिंगोली: हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी लाखो भाविकांच्या रांगेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना वेळ प्रसंगी कठोर भूमीकाही घ्यावी लागली. मात्र त्यातच एका महिला भाविकाला चक्कर आल्यानंतर त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने क्षणाचही विलंब न लावता त्यांचे 4 वर्षाचे मुल सांभाळलेच शिवाय त्यांना ताताडीने आरोग्य सेवाही मिळवून दिली. आरती साळवे असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हिंगोली येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढणार असल्याचे लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक श्री राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक श्री उदय खंडेराय, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री पंडीत कच्छवे यांच्या पथकाने बंदोबस्ताचे नियोजन केले. शुक्रवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यामध्ये महिला भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे बंदोबस्तावर महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते. बंदोबस्तावर असलेले अधिकारी व कर्मचारी गुरुवारी रात्रीपासूनच बंदोबस्तावर हजर झाले होते.
रांगेतच आली चक्कर
दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास बाहेर गावाहून आलेल्या एका महिला भाविकाला रांगेतच चक्कर आली. त्यामुळे त्यांच्या हातात असलेले तीन ते चार वर्षाचे मुल देखील त्यांना सांभाळता येत नव्हते. सदर प्रकार त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या दामीनी पथकातील महिला पोलिस कर्मचारी आरती साळवे यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या मुलास जवळ घेतले अन त्या महिलेस रांगेच्या बाहेर काढून आरोग्य पथकाकडे नेऊन त्यांना आरोग्य सेवा दिली.
एक तास केला सांभाळ
विशेष म्हणजे साळवे यांनी एक तास त्या मुलाचा सांभाळ केला. मुल झोपलेले असतांनाही त्याला आपल्या कुशीत घेऊन त्यांनी बंदोबस्त केला. एक तासानंतर महिला भाविक शुध्दीवर आल्यानंतर मुलास त्यांच्या हवाली केले. लाखो भाविकांच्या दर्शन रांगेमध्ये कधी कठोर भुमीका घ्यावा लागणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आरती साळवे यांनी दाखविलेले ममत्व कौतूकाचा विषय बनले. त्या ठिकाणी रांगेत असलेल्या महिला भाविकांनी साळवे यांचे कौतूक करून त्यांचे आभारही मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com