ग्रामीण भागातील शिक्षणाला बळकटी – पोस्को महाराष्ट्र स्टीलतर्फे हर्णे आदिवासीवाडी शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण….

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड


रायगड :-आज दिनांक २१ जानेवारी रोजी हर्णे आदिवासीवाडी शाळेचा उद्घाटन समारंभ पोस्को कंपनीचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, शिरसाड ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, निजामपूर केंद्र प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. पोस्को महाराष्ट्र स्टीलने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत या शाळेचे संपूर्ण नव्याने बांधकाम करून विद्यार्थ्यांना नवी आशा आणि संधी उपलब्ध करून दिली आहे. या बांधकामामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्याचे नवीन पर्व सुरू झाले आहे. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत करण्यात आलेली ही १२ वी शाळा आहे.
पूर्वीची स्थिती पाहता, शाळेच्या इमारतीची दुरवस्था, मर्यादित साधने आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक अडचणी येत होत्या. जुन्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसणे धोकादायक होते. मात्र, पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या पुढाकारामुळे आता ही शाळा आवश्यक सुविधांनी युक्त झाली आहे. नवीन इमारतीमध्ये प्रशस्त वर्गखोल्या, पंखे, दिवे, चांगल्या दर्जाची स्वच्छता सुविधा, खेळाचे मैदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना आता या वर्षीचा प्रजासत्ताक दिवस नवीन शाळेत साजरा करता येणार याचा खूप आनंद झाला. शाळेच्या नवीन इमारतीमुळे पटसंख्या वाढेल असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
उद्घाटनप्रसंगी पोस्को महाराष्ट्र स्टीलचे वरिष्ठ अधिकारी श्री. सँग कुग हन यांनी सांगितले की, ही शाळा केवळ एक इमारत नसून या भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी संधी आहे, शिक्षणामुळे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, आणि पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून हे सुनिश्चित केले आहे की, इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्यासाठी उत्तम सुविधा मिळतील. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या नव्या शाळेच्या विकासाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. काही पालकांनी सांगितले की, “आमच्या मुलांना आता सुरक्षित वातावरणात शिकता येणार तसेच चांगल्या सुविधा मिळणार आहेत, याचा आम्हाला आनंद आहे.” विद्यार्थ्यांनीदेखील नवीन शाळा बघून आनंद व्यक्त केला आहे. या मंगल समयी शाळेत आंबा, चिक्कू, पेरू, जांभूळ, फणस या फळझाडांची लागवड देखील केली.
पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी शिक्षणासोबतच आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. स्थानिक समुदायाच्या विकासासाठी ही कंपनी सातत्याने कार्यरत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण हा या उपक्रमांचा एक महत्त्वाचा घटक आहे. उत्कृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळांबद्दल ओढ निर्माण होईल अशी आशा वाटते. हा प्रकल्प केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, भविष्यातील सुशिक्षित आणि प्रगत समाजाच्या निर्मितीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पोस्को महाराष्ट्र स्टीलने घेतलेला हा पुढाकार इतर उद्योगांसाठीही प्रेरणादायी ठरेल.