नंदुरबार, ता. ३ प्रकाशा (ता. शहादा) येथे गुजरातमधील नवसारी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह एका युवकाशी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ऑपरेशन अक्षताच्या पथकाने विवाहस्थळी जाऊन अल्पवयीन मुलाचा विवाह रोखला. तसेच दोन्हीकडील पालकांना समज दिली. या वेळी पालकांनी लग्नाचे वय पूर्ण झाल्यावरच विवाह करण्याची लेखी हमी दिली.
बालविवाहांना प्रतिबंध करणे, तसेच महिलांविषयक कौटुंबिक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक
पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा उपक्रम या वर्षी जागतिक महिला दिनापासून सुरू करण्यात आला आहे. गुजरातमधील नवसारी येथील अल्पवयीन मुलीचा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका मुलासोबत ३० एप्रिलला बालविवाह होणार असून, २९ एप्रिलला हळदीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती २९ एप्रिलला पोलिस अधीक्षक पाटील यांना माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक पाटील यांनी अक्षता समितीच्या सदस्या सहाय्यक पोलिस निरीक्षक नयना देवरे यांना कळवून पोलिस ठाणे स्तरावरील अक्षता समितीमार्फत हा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशित केले.
अक्षता समितीच्या सदस्यांनी वर
मुलाकडे व त्याच्या कुटुंबीयांकडे नवसारी येथील वधू मुलीबाबत विचारपूस केली असता वधू मुलगी ही उदईक विवाहाच्या वेळी प्रकाशा येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वधू मुलीच्या जन्मतारखेबाबत विचारपूस केली असता मुलीचे वय १६ वर्षे आठ महिने असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अक्षता समितीने तेथे असलेला वधू मुलगा व त्याच्या नातेवाइकांना तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच शहादा पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या पालकांना ही बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
उपसंपादक – रणजित मस्के
नंदुरबार