मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या नोंदणीला सुरूवात जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :– दि. २३ (जिमाका) : युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे.

प्रशिक्षणार्थीना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार असल्याची माहिती सहायक आयुक्त प्रभाकर गं. हरडे, यांनी दिली.

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रकाशित केला आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे.

उमेदवाराची पात्रता : किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/आयटीआय/पदवीका/पदवी/पदव्युत्तर असावी. मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

आस्थापना/उद्योगासाठीची पात्रता : आस्थापना /उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा. आस्थापना /उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी . आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान ३ वर्षापूर्वीची असावी. आस्थापना/उद्योगानी ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, सर्टीफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन, डीपीआयटी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावा.

कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल. या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रातील आस्थापना /उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतात. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापना/उद्योग/महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या ५ टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. जिल्हास्तरीय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती या योजनेचा वेळोवेळी आढावा घेईल. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर उमेदवार व उद्योजक नोंदणी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट