दुर्गम भागात भटकंती करताना खड्यात मरणासन्न अवस्थेत अडकलेल्या बैलाची पशुप्रेमींनी केली सुटका

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव, दि. २८ ऑगस्ट माणगांव मधिल वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर व त्यांचे तीन मित्र सचिन वनारसे, परेश मोरे, सागर पाटील हे निसर्गरम्य परिसरात २७ ऑगस्ट रोजी भटकंती करीत असताना म्हसळ्यातील वाघाव बौध्दवाडी जवळील दुर्गम भागातुन कच्च्या रस्त्यावरुन आपल्या कारने जात असताना त्यांचे नजरेस रस्त्यालगत जमिनीवर एका बैलाचे फक्त डोके आणि दोन शिंग हालताना दिसली. त्यांनी त्वरित येथे थांबून पाहणी केली असता येथील रस्त्याकडेच्या मोरी लगतची जमिन खचुन सुमारे दहा फूट खड्ड्यातून या शंकराचे वहान समजले जाणाऱ्या नंदी अर्थात बैलाला अक्षरशहा चिखलातून अडकलेल्या अवस्थेतून सोडवून सुरक्षित रित्या बाहेर काढून ऐन श्रावणात सायंकाळी चारचे सुमारास एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर या मुक्या प्राण्यास जीवनदान दिले.

हा बैल अनेकतास जीवाच्या आकांताने या निर्मनुष्य ठिकाणी रस्त्यालगत पडल्याने त्याने बाहेर पडण्याचा पुष्कळ प्रयत्न केल्यानेच तो चिखलात आपले शरिर पिळवटून मरणासन्न अवस्थेत गोल वळकटी प्रमाणे निपचीत अडकुन पडला होता. हे दृष्य पहाताच या चार मित्रांनी जवळील गावातील वस्ती कडे जात, येथील ग्रामस्थांकडे हा बैल कोणाचा आहे याची चौकशी केली. गावातील दोन जेष्ठ व्यक्ती रमेश मोरे, धोंडीराम मोरे यांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यांचे पाठोपाठ बैलाचे मालक जगन महाडिक देखील येथे धावत आले. व त्यांनी हा आपला “पोपट” नामक बैल असल्याचे म्हटले.

तसेच वाघाव गावातील तरुण मंडळी साहिल साळवी, सुमेश महाडिक, सुशांत महाडिक, साहिल जाधव, पियुष जाधव या ठिकाणी मदतीस धावून आले आणि भटकंती करणारे हौशी मित्र सचिन वनारसे, सागर पाटील, परेश मोरे व शंतनु कुवेसकर यांच्या मदतीने प्रसंगावधान बाळगुण त्यांनी कारच्या बोनेटला जाड दोर खंडाने बांधुन बैलास सुरक्षित ओढुन खड्ड्यातून बाहेर काढले. हा बैल मलुल अवस्थेत पडुन राहीला. त्यास सचिन वनारसे याने आपल्या सोबत आणलेल्या बिसलरी बाटलीतील पाणी वापरुन स्वच्छ धुतले. खड्ड्यातून बाहेर काढून बैलाला बांधलेले दोरखंड सोडताच हा जमिनीवर निपचीत पडलेला बैल थोड्या वेळात उठुन उभा राहत चक्क धावु लागला. यावेळी या बचावकार्यात सामील झालेल्या सर्वांनी “हर हर महादेवचा” एकच जल्लोष केला. एका मुक्या जनावराची प्राण संकटातून सुटका झाल्याचे समाधान सर्वांचे चेहऱ्यावरील आनंद लहरीने खुलले.म्हसळा तालुक्यातील वाघाव बौध्दवाडी येथील दुर्गम भागात भटकंती करताना खड्यात मरणासन्न अवस्थेत अडकलेल्या बैलाची पशुप्रेमींनी येथील ग्रामस्थ तसेच तरुणांचे मदतीने एका मुक्या जनावराची केली सुटका, “पोपट” नामक बैलास दिले जिवनदान त्याची ही क्षणचित्रे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com