बोरघर गावात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न, भक्तीरंगाने पावन झाले गाव…!

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव – रायगड, 15.जाने: माणगांव तालुक्यातील बोरघर या गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताह व संपूर्ण ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पारायण योजिले होते. अखंड हरीनाम सप्ताहाच्या पवित्र अनुभूतीत गावाने भाविकतेचे डोह पूर्ण केले. सलग सात दिवस हरिनामाच्या अखंड प्रवाहाने गावातील वातावरणात आध्यात्मिक चैतन्य जागवले. भक्तीच्या गजरात जणू देवत्व पृथ्वीवर अवतरले असे भासत होते.
सप्ताहाचा प्रारंभ बुधवार, दि. 8 जानेवारी 2025 रोजी पहाटे काकड आरतीने झाला. मंदिर प्रांगण फुलांच्या तोरणांनी सजवले गेले होते, जिथे सुवासिक उदबत्त्यांचा धुराळा भक्तीच्या आभासाची साक्ष देत होता. गावातील गल्लीबोळापासून मंदिर परिसरापर्यंत भक्तीचा समुद्र लाटांप्रमाणे भरून वाहत होता. हरिपाठाच्या पवित्र सुरांतून भक्तांच्या ओठांवर रामकृष्ण हरिचे नाम सतत फुलत होते. कीर्तन, प्रवचन, व भजनाच्या कार्यक्रमांनी जणू गावाला आध्यात्मिक शृंगार चढवला होता. गावकरी व बाहेरून आलेल्या भाविकांनी सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग घेतला. रोज सकाळी हरिपाठाच्या गोड सुरांमुळे मनं शांत होत होती, तर प्रवचन आणि कीर्तनांनी मनोबुद्धी उन्नतीची वाट दाखवली.दररोजचे भजन, कीर्तन, व हरीनाम जपात जणू गावाने रामनामाचा जयजयकार केला. परिसरातील प्रख्यात कीर्तनकारांनी आपल्या अध्यात्मिक शब्दांतून भगवान विठ्ठल व रुखमाई यांच्या लीला उजळल्या. तसेच शिवचरित्र आणि कीर्तनाच्या मधुर लयीत श्रोते हरवून गेले आणि भक्तीच्या अश्रूनी नेत्र ओले झाले.गावातील बालचमू, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनी निस्सीम सेवाभावाने सहभाग घेतला. महिलांनी सामूहिक हरिपाठ सादर करत भक्तीरसाचा झरा अखंड सुरू ठेवला. गाभाऱ्यात दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला, तर सभोवतालच्या गजराने देवत्वाचे बळ वाटले.
समारोपाचा दिव्य सोहळा:
सप्ताहाचा समारोप एका विशेष कार्यक्रमाने करण्यात आला. पहाटे महाआरतीच्या दिव्यतेने प्रांगण भक्तीरसात न्हाले. संपूर्ण गावभर दिंडी सोहळा झाला. हरीनामच्या गजरात अवघी दुमदुमली बोरघर नगरी. लोकांना धर्म, समाज आणि आत्मज्ञान या तिन्हींचं महत्त्व पटवून देणारे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर मंदिर प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन होते, जिथे हजारो भाविकांच्या ओंजळीत परमेश्वराची कृपा अगदी अलवार भरली गेली. भाविकांच्या उत्साही सहभागामुळे सारा गाव भक्तिभावाच्या एका साखळीत गुंफला गेला. सप्ताहाने जणू गावाला अध्यात्मिक उन्नतीचे पंख लावले. आयोजक मंडळाच्या अथक मेहनतीने हा सप्ताह अधिक सुरेल, अधिक दिव्य झाला. पुढील वर्षीही या भक्तिरसाच्या गंगेचे प्रवाह अधिक तेजाने व शांततेने प्रवाहित होतील, असा संकल्प गावकऱ्यांनी केला.
भाविकांचा उत्सवामध्ये सहभाग:
गावकऱ्यांनी एकत्र येऊन केवळ अध्यात्मिक साधना नव्हे, तर सामाजिक एकोपा व सेवाभाव टिकवण्याचा संदेश दिला. “जिथे देवाचे नाम आहे, तिथे सुख-समृद्धीचा दरवळ असतो,” हा संदेश या सोहळ्याने प्रत्येकाच्या अंतःकरणात रुजवला. अखंड हरीनाम सप्ताहाने गाव फक्त अध्यात्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक ऐक्याचे हृदय स्पर्शी दर्शन घडवले. भगवानाच्या नामस्मरणात डुबलेले हे क्षण गावाच्या इतिहासात नक्कीच सुवर्णक्षण ठरतील – निखिल सुतार (बोरघर -माणगांव )