एका तरुणाला स्वस्तात गावठी पिस्तूल विकून गेल्या २१ दिवसांपासून फरारी असलेल्या सराईत गुंडाला आयुक्तालयाच्या खंडणीविरोधी पथकाने सिडकोतून जेरबंद केले.
योगेश रघुनाथ मराठे (वय २८, रा. सैलानी बाबा चौक, जेल रोड व कारगिल चौक, चुंचाळे) असे पिस्तूल विक्री करणाऱ्याचे नाव आहे. त्याने हे पिस्तूल कुठून आणले होते, आतापर्यंत किती पिस्तुलांची कुणाला विक्री केली, याची माहिती संकलित केली जात आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालय हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्याने पथक संशयितांच्या मागावर होते. त्यानुसार ९ एप्रिलला चुंचाळेतील दातीरनगरजवळ असलेल्या केदारनाथ ट्रान्स्पोर्टबाहेर संशयित मयूर रामदास गांगुर्डे (वय २८, रा. सुयोग अपार्टमेंट, कमल स्वीटसमोर, दातीरनगर) याने पिस्तूल व काडतुसे जवळ बाळगल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला जेरबंद केले होते.
गांगुर्डेकडे पथकाने विचारणा करत पिस्टल, मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे कुठून आणली याबाबत माहिती घेतली. तेव्हा त्याने हे पिस्तूल योगेश मराठेकडून खरेदी केल्याचे सांगितले. याबाबत अंबडला गांगुर्डेवर आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. ज्याला आपण पिस्तूल विक्री केले, त्याला पोलिसांनी पकडल्याची माहिती कळताच मराठे ९ तारखेपासून पसार झाला. तो बुधवारी (दि. २६) पाथर्डी फाटा येथे येणार असल्याची माहिती अंमलदार निकम व जुंद्रे यांना समजली. त्यांनी पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांना सांगताच सापळा रचून पाथर्डी फाटा येथून त्याला ताब्यात घेतले. त्याचा ताबा अंबड पोलिसांकडे देण्यात आला आहे.