महाराष्ट्र पोलीसांची / कर्तव्यदक्ष , निर्भिड , पोलीस अधिकारी यांची नाहक बदनामीचे वक्तव्य करणाऱ्या संबंधित महिले विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेची मागणी..

सह संपादक -रणजित मस्के
ठाणे


आज दिनांक : २९ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य हे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे , कल्याण पश्चिम येथे उपस्थित राहिले. सदर प्रकरणात स्वघोषित समाजसेविका श्रीमती कल्पना राणी सुनीता दिलीप कपोते यांनी समाजमाध्यमावर महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, विशेषतः कल्याण शहरातील पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस उपआयुक्त तसेच महिला अधिकारी यांच्याविरोधात कोणताही आधार नसताना , ठोस पुरावे नसताना अत्यंत बिनबुडाचे, खोटे व बदनामीकारक वक्तव्य केल्याने पोलीस दलात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आज महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने व सेवानिवृत्त पोलीस अधिकार्यांच्या उपस्थितीत सन्मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांना अधिकृत पत्र देण्यात आले. या पत्रामार्फत, संबंधित महिलेविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
सदर प्रकारामुळे केवळ संबंधित अधिकारीच नव्हे, तर संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस दलाच्या शिस्तप्रिय आणि निष्ठावान प्रतिमेला सामाजिक माध्यमांवर बिनबुडाचे आरोप करून मलिन करण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत निषेधार्ह असून यापुढे अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटना कर्तव्यदक्ष अधिकारी व पोलिस दलाच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असून अशा प्रकारच्या खोट्या आरोपांवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी, हीच शासन व पोलीस प्रशासनाकडे एकमुखी मागणी आहे.
सदरील प्रकरणी केलेले आरोप चोवीस तासांत पुराव्यानिशी संबंधितांनी सिद्ध करून द्यावेत , सदरील केलेले आरोप सिद्ध करून न दिल्यास संबंधितांविरुद्ध सखोल चौकशी करून तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात यावी वा सदरील प्रकरणी प्रशासनाचे वतीने कोणतीही कार्यवाही न करण्यात आल्यास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व सेवानिवृत्त पोलीस संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
जय हिंद..!
जय महाराष्ट्र..!
– महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना , ठाणे जिल्हा