महाड मध्ये शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची बाजी…
४८ पैकी शिंदे गटाकडे ३० तर महाविकास आघाडीकडे १८ ग्रामपंचायती..
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाड तालुक्यात आज झालेल्या ४८ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीमध्ये शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला यश मिळाले असले तरी महाविकास आघाडीने देखील या ग्रामपंचायत निवडणुकीत १८ ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. मतमोजणी नंतर विजयी उमेदवारांच्या शहरात आणि गावागावात मिरवणुका काढून जल्लोष व्यक्त केला गेला.
महाड मध्ये ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी ४८ ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष मतदान झाले. आज सकाळी ८:३० वाजता महाड मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात ग्रामपंचायत मतमोजणीस सुरवात झाली. यावेळी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात आला. १६ ग्रामपंचायतीचे असे एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या. मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेद्वारांनी महाड शहरातून मिरवणुका काढत गावात देखील जल्लोष केला.
महाड तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, अरविंद घेमुड यांनी हि मतमोजणी शांततेत पार पाडली.
महाड तालुक्यात आमदार गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाला . या निवडणुका लढवल्या.
आमदार गोगावले यांनी एकूण ४८ ग्रामपंचायतीपैकी ३० ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र नव्यानेच महाड तालुक्यात महाविकास आघाडीने १८ ग्रामपंचायतीवर विजय प्राप्त करत तालुक्यात चांगले यश संपादन केले आहे.
एकीकडे राजकीय वर्चस्व आणि हातातील सत्ता पाहता शिंदे गटाला ४८ ग्रामपंचायतीवर विजय मिळवण्याची दावा आमदार गोगावले यांनी केला होता मात्र महाविकास आघाडीने हा दावा मोडीत काढला आहे. यामुळे कांही ठिकाणी आनंद तर कांही ठिकाणी नाराजी दिसून आली. यामध्ये शिंदे गटाच्या आमदार गोगावले यांचे बालेकिल्ले असलेले वहूर, दासगाव, सवाणे, बारसगाव याठिकाणी मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यातील नडगाव, कांबळे तर्फे बिरवाडी, तळीये, कोळोसे, अप्पर तुडील, वाघोली, या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश संपादन केले आहे.
महाड तालुक्यातील वाळसुरे, दासगाव, फौजी आंबावडे, गांधारपाले, कोथेरी, वरंध या ग्रामपंचायती मात्र महाविकास आघाडीने आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. यामुळे महाड तालुक्यातील राजकारणाला महाविकास आघाडीने नवे वळण दिले आहे.
महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील दासगाव, वहूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या गावात मात्र महाविकास आघाडीने मोठा बदल केला आहे. दासगाव मध्ये शिंदे गटाच्या सदस्यांपैकी चार शिंदे गटाकडे तर उर्वरित महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत. दासगाव मध्ये सरपंच पदासाठी दोन्ही उमेदवार महिला असल्या तरी महाविकास आघाडीकडून सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या २४ वर्षीय तपस्वी जंगम या तरुणीने तब्बल ३७० मतांनी विजय मिळवला आहे.
सावरट आणि चिंभावे वर भाजपचा दावा – मनसे मात्र शून्य
महाड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला बाळासाहेबांच्या शिवसेनेने जवळ केले नसल्याने भाजपची चांगलीच पंचायत झाली. कांही ठिकाणी भाजपने निवडणुका लढवण्याचा निर्णय स्थानिक ग्राम आघाड्या बरोबर घेवून आपले उमेदवार उभे केले. चिंभावे आणि सावरट या ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. या दोन्ही ग्रामपंचायती मात्र महाविकास आघाडीकडे असल्याचा दावा महाविकास आघाडीने देखील केला आहे. यामुळे तालुक्यात भाजपला आपले खाते खोलणे शक्य झाले नाही. तालुक्यात मनसे देखील शून्यात असल्याचे दिसून आले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने सरपंच पदासाठी एकही उमेदवार दिलेला नाही.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com