ब्लॅकआऊट प्रात्यक्षिक – विजय कॉलनी, टॅप्स निवासी वसाहतीच्या समोर तारापुर बोईसर रोड

उपसंपादक-मंगेश उईके
बोईसर
दिनांक 9 मे 2025 रोजी रात्री 8:00 वाजता तारापूर-बोईसर रोडवरील विजय कॉलनी, टॅप्स निवासी वसाहतीच्या मुख्य गेटसमोर ब्लॅकआऊट प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पडले. हवाई हल्ल्याच्या संभाव्य धोका स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनच्या आवाजाने झाली. दोन मिनिटे कमी-जास्त आवाजात सायरन वाजवून “लाल इशारा” म्हणजेच हवाई हल्ल्याचा धोका दर्शविण्यात आला. तत्काळ सर्व वसाहतीतील नागरिकांनी विजेचे दिवे बंद केले, दरवाजे-खिडक्या बंद करून पडदे लावले, काचांवर खाकी कागद लावले आणि शांततेने घरात थांबले.
सुमारे दहा मिनिटांनंतर सायरनच्या एकसमान आवाजाद्वारे “हवाई हल्ला संपला” असा हिरवा सिग्नल देण्यात आला. त्यानंतर नागरिकांना प्रथमोपचार, आग विझवण्याचे प्राथमिक उपाय, तसेच ब्लॅकआऊट संदर्भातील महत्वाची माहिती देण्यात आली.
हा उपक्रम जिल्हा प्रशासन व नागरी संरक्षण दल यांच्या पुढाकाराने पार पडला. यामुळे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धतीची जाणीव निर्माण झाली.