मद्यपान साठी पैसे न दिल्याने ५ आरोपीने केला सैय्यद कुटुंबियांवर हल्ला.. १९ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू..

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

दि.६ कल्याण(ठाणे):– कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर परिसरात रविवारी रात्री एका भाजीविक्रेत्याच्या कुटुंबावर पाच जणांनी हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडित व्यक्तीच्या १९ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचे वडील आणि आईही गंभीर जखमी झाले आहेत. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना ५ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. निसार सैय्यद नजीर सैय्यद (वय ४०), हे राहत्या घरी जेवण करत असताना आरोपी गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना (वय ४५) याने त्यांच्याकडे मद्यपानासाठी पैसे मागितले. सैय्यद यांनी नकार दिल्यानंतर हा वाद विकोपाला गेला.रागाच्या भरात आरोपी गुलाम शेख याचा मुलगा अब्दुल रहमान शेख व त्याचे मित्र – शोएब रहिम शेख, अजिज इब्राहिम शेख व शाहिद युसुफ शेख – यांनी सैय्यद यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात सैय्यद यांची पत्नी व मुलगी सानिया यांनी हस्तक्षेप करताना आरोपींनी लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात सानिया सैय्यद (वय १९) हिच्या डोक्याला जोरदार मार बसल्याने ती गंभीर जखमी झाली आणि जागीच मृत्यू पावली. तिच्या आई-वडिलांवरही उपचार सुरू आहेत. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी १) गुलाम शेख उर्फ मुन्ना, २) अब्दुल रहमान शेख, ३) शोएब शेख, ४) अजिज शेख, व ५) शाहिद शेख यांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (कलम १०३(१), १८९(२), १९१(२)(३), १९०, ३३३, ११८(१), ११५(२)). या यशस्वी कारवाईसाठी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि ज्ञानेश्वर साबळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने कामगिरी बजावली. पुढील तपास पोनि श्रीनाईक, व पोनि नागरे हे करत आहेत.
या घटनेने इंदिरा नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.