संविधान गुण गौरव’ परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग…

प्रतिनिधी:-सचिन पवार
माणगांव रायगड


माणगांव :-संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी संविधानिक मूल्ये पोहोचावीत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या ‘घर घर संविधान’ या निर्णयाची अंमलबजावणी माणगांव गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या नेतृत्वाखाली रायगड mजिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नाविन्यपूर्ण पद्धतीने विविध उपक्रम राबवून करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज माणगाव तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील इयत्ता तिसरी ते अकरावी पर्यंतच्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांची बहुपर्यायी स्वरूपाची एक संविधान गुण गौरव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर उपक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला.
गेल्या चार महिन्यांपासून माणगाव तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या परिपाठादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाविषयी साध्या सोप्या भाषेत विश्लेषण करणाऱ्या आपले संविधान या संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण सर लिखित लेखमालेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत होते. याच लेखमालेवर आधारित अभ्यासक्रम सदर परीक्षेसाठी निश्चित करण्यात आला होता.अशाप्रकारे नावीन्यपूर्ण पद्धतीने घर घर संविधान या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणारा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका हा महाराष्ट्र राज्यातील कदाचित एकमेव तालुका असावा.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, विस्तार अधिकारी कुमार खामकर, धुळदेव कोळेकर, शंकर शिंदे, सर्व केंद्रप्रमुख, संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण, सर्व साधन व्यक्ती, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांचे मा. मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनींनी यशस्वी प्रयत्न केले.