एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हाताने मोहफुल संकलन; ‘त्या’ वयोवृद्ध महिलेसाठी भामरागड पोलीसांची अशीही संवेदनशीलता..

सह संपादक -रणजित मस्के
गडचिरोली


अहेरी: पोलीस म्हणजे नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखणारे रक्षक एवढीच त्यांची ओळख. मात्र ते गुन्हेगारांवर कारवाई करतानाच आपत्कालीन परिस्थितीत मदत करतात आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतात तसेच वेळप्रसंगी नागरिकांना मदतीचा हात देखील देतात. याची प्रचिती परत एकदा भामरागड तालुक्यात दिसून आली. भामरागड तालुक्यातील दरबाच्या जंगल परिसरात नक्षल शोध मोहीम राबविणाऱ्या पोलीसांनी मोहफुल संकलन करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेच्या मदतीला धावल्याने पोलिसांमधील संवेदनशीलता दिसून आली.सध्या गडचिरोली जिल्ह्यात मोहफुल संकलन करण्याचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्याचा दक्षिण भाग हा घनदाट जंगलांनी व्यापला असून या जंगलात मोठ्या प्रमाणात मोहाचे झाडं आढळून येतात.
या भागातील आदिवासी बांधव भल्या पहाटे मोहफुल संकलनासाठी घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. यात सर्वात जास्त वयोवृद्धांचा समावेश आहे. कल्पवृक्ष म्हणून ओळख असलेल्या मोहाच्या झाडाचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे. त्यात मोह फुलांचे विशेष महत्त्व आहे. या मोसमात मोहफुल संकलन आणि तेंदूपत्ता संकलन करून आदिवासी बांधव बऱ्यापैकी पैसे गोळा करतात. दारूसाठी बदनाम असलेल्या मोह फुलांमध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात तसेच मोह फुलांपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळेच मोहफुलांची मोठी मागणी आहे.
या मोसमात सर्व कामधंदे बाजूला ठेवून आदिवासी बांधव भल्या पहाटेपासूनच मोहफुल संकलन करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम दरबा गावाच्या जंगल परिसरात अशीच एक वयोवृद्ध महिला मोहफुल संकलन करत असल्याचे लक्षात येताच नक्षल शोध मोहीम राबविणारे पोलिसांनी हातभार लावत त्या महिलेला मोहफुल संकलनाच्या कामात मदत करताना दिसून येत आहेत.भामरागड तालुका मुख्यालयातील पामुलगौतम नदीपलीकडील भाग हा नक्षल्यांचा गड मानला जातो. मात्र, मागील काही महिन्यातच पेनगुंडा, नेलगुंडा आणि कवंडे येथे गडचिरोली पोलीस दलाने नवीन पोलीस स्टेशन उभारल्याने हा परिसर आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. या भागातील आदिवासींना मूलभूत सुविधा देण्यासाठी गडचिरोली पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. अश्यातच या भागात आता मोठ्या प्रमाणात नक्षल शोध मोहीम देखील राबविण्यात येत आहे. भामरागडचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी क्यूआरटी पथक, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना घेऊन २७ मार्च रोजी नक्षल शोध मोहीम राबवित असताना दरबा गावाच्या जंगल परिसरात एक वयोवृद्ध महिला मोहफुल संकलन करताना आढळले. उन्हाचे चटके खात घामाघूम झालेल्या आजीची अवस्था पाहून पोलिसांना दया आली आणि लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आजीला मोहफुल संकलनाच्या कामात हातभार लावण्यास पुढाकार घेतला. लगेच सर्वच जवानांनी सहकार्य करत दहा मिनिटातच मोहफुल संकलन करून दिले.