लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
थोडक्यात हकिकत :-
सदर घटना ही मौजे कदमवाक वस्ती गावचे हद्दीत, तुळजाभवानी मंदिरासमोर, पठारेवस्ती, ता. हवेली, जि. पुणे येथे दिनांक १३/०६/२०१९ रोजी रात्रौ ११:१० वाजताच्या सुमारास घडली आहे. यातील आरोपी योगेश परसराम बसेरे, रा. पठारे वस्ती, कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि.पुणे मूळ रा.जुने शहर पोलीस चौकीजवळ, अकोला, जि. अकोला हा त्याची पत्नी हिचे चारीत्र्यावर संशय घेत असल्याने ती तिच्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी राहण्यास गेली होती. आरोपीने रात्रीच्या वेळी त्यांना भेटण्याकरीता त्यांच्या माहेरी जाऊन पत्नी व त्यांचा मुलगा यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील लोखंडी धारदार हत्याराने त्या दोघांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मुलगा वय ६ वर्षे याचा मृत्यू झाला आहे. फिर्यादी त्या दोघांना वाचवण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यावर देखील धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर स्वतःकडील धारदार हत्याराने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ४५१/२०१९ भा.दं. वि. कलम ३०२,३०७,३०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास
सदर गुन्हयाचा तपास श्री. राजू महानोर, सहा. पोलीस निरीक्षक यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. ९४४/२०१९ असा आहे.
शिक्षा
वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक ०७/०२/२०२५ रोजी सश्रम कारावासासह जन्मठेप व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
कामगिरी
सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. नामदेव तरळगट्टी, कोर्ट पैरवी श्रीमती ललिता कानवडे, यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरी करीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोहवा २१४८ ललिता कानवडे व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि श्री राजू महानोर यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.