50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा झाला शुभारंभ ,शेतकऱ्यांनी बांबू लागवडीतून आपले जीवन बदलावे

0
Spread the love

उपसंपादक – मंगेश उईके

पालघर :
-राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

पालघर,दि.5:- बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यामध्ये मोठा वाव आहे. या लागवडीतून जिल्ह्यातून होणारे स्थलांतर देखील रोखता येणे शक्य आहे. बांबू उत्पन्न आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून मार्केट लीकेज आणि प्रक्रिया उद्योगाला जोडण्याचे पुढील तीन ते पाच वर्षात प्रयत्न करू. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवडीतून आपले जीवन बदलावे असे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोग व कार्यकारी मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज धानिवरी ता.डहाणू येथे केले.
‘संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना महाराष्ट्रातील दुर्गम पालघर जिल्ह्यातील धानिवरी ता.डहाणू या आदिवासी पाड्यावर अभिनव 50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा संकल्प प्रत्यक्ष बांबू लागवड शुभारंभ करून झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास राज्याचे पण सहकार व वस्त्र उद्योग सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड़, उपविभागीय अधिकारी विशाल खत्री, वनसंरक्षक निरंजन दिवाकर, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) विजया जाधव, धानिवरीचे सरपंच शैलेश कोडा, उद्योगपती दिनेश शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.पटेल म्हणाले की, बांबूची चळवळ ही राज्य आणि देशपातळीवर पोहोचली. पालघर जिल्हा प्रशासनाने बांबू लागवडी बाबत चांगला दृष्टिकोन स्वीकारला आहे. बांबूच्या माध्यमातून निश्चितपणे पालघर जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. ही चळवळ पुढे नेण्यासाठी जी काही शासन स्तरावरून मदत आणि मार्गदर्शन लागेल ते निश्चितपणे माझ्याकडून दिले जाईल. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पारंपारिक भात शेतीचे गणित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उलगडून सांगत न परवडणाऱ्या भात शेतीपेक्षा सात लाख चार हजार रुपयांच्या अनुदान देऊन केलेली बांबू शेती आदिवासींचे आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलेल. वातावरण बदलाचे संकट रोखण्यासाठी बांबू महत्त्वाचा आहे. यातून सर्वाधिक ऑक्सिजन निर्मिती आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता आहे. बांबू लागवडीसाठी खड्डे, रोपे, देखभालीचा खर्च सर्व शासन स्तरावरून अनुदानाच्या रूपाने शेतकऱ्यांना मिळणार आहे. धानिवरी गावाने सहकार्य दाखवून 1 हजार बांबू उत्पादक शेतकरी उभे केल्यास आपण केंद्राच्या योजनेतून बांबूचे युनिट याच गावात उभे करू त्याचबरोबर महिला बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या संधी गावातच निर्माण केल्या जातील. त्यासाठी शक्य झाल्यास गाव देखील दत्तक घेण्याची तयारी असल्याचे श्री.पटेल यांनी यावेळी सांगितले. तसेच बांबू पासून विविध प्रकारचे इंधन निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगत त्यासाठी पालघर जिल्ह्यात प्रकल्प उभारून जवळपास दोन लाख टन बांबूची गरज निर्मिती करण्याची तयारी असल्याचे सांगितले.
पाशा पटेल म्हणाले की, धानिवरी गावातून बांबू लागवडीचा शुभारंभ होत आहे. प्रशासनाला फक्त योजना राबवून अनुदानाचा लाभ द्यायचा नाही तर संपन्न कुटुंब आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी हे ध्येय देखील पूर्ण करायचे आहे त्यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे. गावाने मिळालेल्या 50 हेक्टर सामूहिक वनपट्ट्यांमध्ये बांबू लागवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही त्यांनी यावेळी गावकऱ्यांचे आभार मानले.
यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने संपन्न मिशन कुटुंब आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी हरित महाराष्ट्र अंतर्गत पर्यावरण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेवटी धानिवरी गावचे सरपंच शैलेश घोडा यांनी यावेळी सर्व उपस्थित त्यांच्या आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट