दैवज्ञ समाजोन्नती परिषदचे २१ वे अधिवेशन व १० वे साहित्य संमेलन पुणे नगरीत संपन्न…

संपादिका – दिप्ती भोगल
पुणे ; अ.भा.दैवज्ञ समाजोन्नति परिषदेचे २१ वे अधिवेशन आणि दैवज्ञ साहित्य मंचचे १० वे दैवज्ञ साहित्य संमेलन दि.१९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४ रोजी विद्येच्या माहेरघरी पुणे नगरीत पुणे महानगर पालिकेच्या गणेश कला क्रिडा रंगमंचच्या भव्य सभागृहात अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात समारंभाध्यक्ष विद्यमान समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. अजय कारेकर यांच्या स्वागताध्यक्षतेखाली संपन्न झाले. श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट ने यजमानपद गोमंतक आणि कारवार दैवज्ञ ब्राह्मण समाज संस्थांच्या संलग्नतेने भूषविले होते.
गुरुवार दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी श्री अष्टभुजा दुर्गादेवी मंदिरात देवीची आरती करून शोभायात्रेस प्रारंभ झाला.
या प्रसंगी समाज प्रबोधनात्मक तसेच साहित्य चळवळीला प्रोत्साहन देणारे घोषणा फलक आणि शोभायात्रेत समाविष्ट झालेले छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दि.२० डिसेंबर २०२४
भव्य उद्घाटन सोहळा
२१ अधिवेशनाचा प्रारंभ दि.२० डिसेंबर २०२४ रोजी झाला.प्रथम श्री गणेश व सरस्वती पूजन, ध्वजारोहण , सामुदायिक प्रतिज्ञा आणि करण्यात आले. अधिवेशन नगरीचे तसेच विविध दालनांचे उद्घाटन झाले.
स्वागत गीताने भव्य उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. यजमान संस्था व मातृसंस्थेतर्फे उपस्थितांचे स्वागत केले गेले. मा.मुख्यमंत्री व मा.उप मुख्यमंत्री तसेच विविध मान्यवर , संस्थांकडून आलेल्या शुभसंदेशांचे वाचन झाले.
प्रास्ताविक,मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर स्मरणिकेचे प्रकाशन झाले. मान्यवरांच्या मनोगतांनंतर अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शनानंतर उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला.
भोजन,विश्रांतीनंतर ‘ समाज कार्यातील ज्ञातीचे योगदान ‘ , ‘ नोकरी की सुवर्ण कारागिरी.’ , ‘सामाजिक कार्यात युवांची वानवा ‘ ,’ ज्ञातीपत्रके व समाज प्रबोधन ‘ अशा विविध विषयांवरील चर्चासत्रे पार पडली.
रात्री स्थानिक तसेच विविध विभागांतील ज्ञाती बंधू भगिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
दि.२१ डिसेंबर २०२४
‘ कौटुंबिक जबाबदारी व महिलांचे सामाजिक योगदान ‘ , ‘ ‘ ‘महिलांचा राजकारणातील सहभाग ” वधू वर मेळाव्यातील आजची वास्तवता ‘, ‘ महिलांनो सावधान , ‘ महिला सक्षमीकरण ‘ , ही चर्चासत्रे आयोजित केली गेली होती.
१० वे दैवज्ञ साहित्य संमेलन उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
दै.स.प.चे १० वे दैवज्ञ साहित्य संमेलन दि. २१ आणि दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी याच सभागृहात साहित्य रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
१० व्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.००वाजता सुरु झाला. संमेलनाध्यक्षा, प्रमुख पाहुणे,समाजश्रेष्ठी आदि मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश,श्री सरस्वती पूजन झाले व श्री श्री स्वामीजी, नाना शंकरशेट यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले .
या दैवज्ञ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध साहित्यिका, हिंदी विषयाच्या गाढे अभ्यासक असलेल्या *श्रीमती कृष्णी वाळके, गोवा होत्या तर उद्घाटक होते दैवज्ञ साहित्य मंचचे पदसिद्ध अध्यक्ष अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेचे विद्यमान अध्यक्ष नामवंत हृदयरोगतज्ज्ञ,साहित्य प्रेमी समाजश्रेष्ठी मा. गजानन रत्नपारखी, स्वागताध्यक्ष कवी,लेखक श्री. संजय चाचड होते तर या दहाव्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे माणून सुप्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक,परखड वक्ते, सखोल अभ्यासक राहुल सोलापूरकर होते. दैसप व
साहित्य मंच तर्फे स्वागत व प्रास्ताविक करण्यात आले.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षां च्या गळ्यात मावळते ( २० वे ) दैवज्ञ साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. माधवराव पोतदार निवर्तल्याने त्यांच्या सुविद्य पत्नींनी अध्यक्ष पदाचे मान चिन्ह असलेले सुवर्णपदक घालून हाती मानाचा दंड दिला. त्यानंतर शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून १० व्या देवज्ञ साहित्य संमेलनाध्यक्षांचा टाळयांच्या गजरात यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.
सायंकाळी कविसंमेलन पार पडले.
रात्री पुन्हा एकदा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
दि.२२ डिसेंबर २०२४
‘ मनःशांती साठी संत साहित्य ‘, ‘ प्रेरणादायी आत्मचरित्रे ‘, ‘ पत्रकारिता आणि साहित्य ‘, ‘ नाट्य व साहित्य ‘, आणि ‘ उगम कवितेचा ‘,
‘ विनोदी साहित्याचे जीवनातील स्थान ‘,
‘ तंत्रज्ञानाने साहित्य वृद्धी ‘, ‘ वेध साहित्य प्रवासाचा ‘ ,’ सन २००० नंतरचे लक्षणीय साहित्य ‘ या विषयांवरील चर्चासत्रे झाली.
समाजश्रेष्ठींची ग्रंथतुला, ग्रंथहंडी हे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
पदाधिकारी, कार्यकर्ता गौरव समारंभ यावेळी संपन्न झाला.
सायंकाळी खुले अधिवेशनामध्ये विषय नियामक समितीच्या सभेत चर्चिलेले विषय मांडण्यात आले व निर्णय घेण्यात आले.
अध्यक्षीय भाषण व आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनतर्फे प्रत्येकाला बॅग तसेच प्रत्येक सत्राला आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
मातृसंस्थेच्या एकविसाव्या अधिवेशन व दहाव्या साहित्य संमेलनाच्या या महासोहळ्यास महाराष्ट्र, गुजराथ, गोवा,कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू अशा विविध राज्यातूनच नव्हे तर परदेशांतूनही ज्ञाती बंधू भगिनी आवर्जून उपस्थित होते.





ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com