भुगाव-भूकूमजवळ खाजगी मिनीबस आगीत जळून खाक, १७ कामगार बचावले..!

प्रतिनिधी -मारुती गोरे
पुणे ग्रामीण :-
दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी चालकाच्या प्रसंगावधनाने कामगार सुखरूप, गाडीतून धूर येऊ लागताच उतरवले खाली.
भुगाव -पुणे -कोलाड महामार्गावर भुगाव आणि भुकूम गावच्या हद्दीवर कामगारांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसने अचानक पेट घेतला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही खाजगी बस क्र. (एम एच ४२बी ०१६९) मुळशीतून कामगारांना घेऊन पुण्यात चालली होती.
चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने हे १७ कामगार सुखरूप बचावले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिरंगुट घाट चढून आल्यानंतर भुकूम गावाच्या हद्दीलगत गारवा हॉटेलच्या उताराला बस आल्यानंतर बोनेट मधून अचानक धूर येत असल्याचे वाहन चालक प्रकाश भाऊसाहेब जाधव (वय ४४,रा वडगाव बु, सिंहगड रोड) यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडी बाजूला घेऊन सर्व कामगारांना खाली उतरवले आणि स्वतःही बाजूला झाले. काही मिनिटांमध्येच गाडीने पेट घेतला. पाहता पाहता बस जळून खाक झाली.
बसमध्ये एकूण १७ कामगार होते. उरवडे येथील इनर्टेक कंपनीमधून कामगारांना घेऊन पुण्यातील वारजे येथे सोडण्यासाठी ही बस निघाली होती. आग विझविण्यासाठी येथील परांजपे स्कीमच्या फॉरेस्ट ट्रेल या टाऊनशिप मध्ये उपलब्ध असलेल्या फायर ब्रिगेडच्या गाडीने ही आग आटोक्यात आणली.
त्यानंतर काही मिनिटातच पुणे महानगरपालिकेमध्ये असलेली फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या ठिकाणी आली होती, परंतु त्यावेळी या बसची आग पूर्णपणे विझवली होती. यावेळी पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तत्काळ वाहतूक पोलीस पाठवून झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.

