गहाळ झालेले १५० मोबाईल संचांचा शोध घेवून मुळ मालकांना कोल्हापूर सायबर पोलीस ठाणेनी केले परत…

सह संपादक -रणजित मस्के
कोल्हापूर :-कोल्हापूर जिल्ह्यातील नागरीकांचे वापरण्यात असणारे मोबाईल संच गहाळ झालेबाबत विविध पोलीस ठाणेंना तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातून गहाळ झालेल्या मोबाईल संचांची तसेच चोरीच्या गुन्ह्यात गेलेले मोबाईल संच यांची सायबर पोलीस ठाणे मार्फत तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवून जास्तीत जास्त मोबाईल नागरीकांना परत मिळवून देणेबाबत मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते.

मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांचे सुचनेप्रमाणे मा. अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग निकेश खाटमोडे-पाटील व मा.अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर विभाग बी धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सायबर पोलीस ठाणेकडील पो.उप निरीक्षक अतिष म्हेत्रे पोलीस अंमलदार सफौ राजेंद्र ताटे, मिनाक्षी पाटील, पोहवा रविंद्र पाटील, सागर माळवे, अमर वासुदेव, अमर आडसुळे, संगिता खोत, अजय सावंत, सचिन बेंडखळे, सुरेश पाटील यांची वेगवेगळे पथके तयार करून गहाळ झालेले मोबाईल संच शोधणेकामी नेमणेत आले. नमुद पथकांनी मागील एक महिन्यांमध्ये तांत्रिक तपास करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून अंदाजे १८,००,०००/- रू. किंमतीचे १५० मोबाईल संच शोधून ते ताब्यात घेणेत पोलीस पथकास यश आले आहे.
आज दि. १९/०६/२०२५ रोजी ज्या लोकांचे मोबाईल संच मिळून आले आहेत त्या नागरीकांना मोबाईल संचाची व त्यांचेकडील कागदपत्रांची ओळख पटवून मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांचे हस्ते मोबाईल संच परत देण्यात आले. नागरीकांना त्यांच्या हरवलेला मोबाईल संच मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल संच मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या सुचनांनुसार मोहीम सुरू केली असून मिळून आलेल्या एकूण १५० मोबाईल संचापैकी १० मोबाईल संच उपस्थित नागरीकांना देण्यात आले. उर्वरीत मोबाईल संच उदईक रोजी पासून संबंधीत मोबाईलसंच-धारक यांना संपर्क साधून देण्याची तजवीज ठेवणेत आली आहे.
सदरकामी मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी पथकाचे अभिनंदन करून भविष्यात देखील सायबर पोलीस ठाणेच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल संच नागरीकांना परत करण्याबाबत सुचना दिल्या असून ही मोहीम भविष्यात देखील सतत्याने राबविण्यात येणार आहे